IPL 2024, Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore: आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात अजिंक्य रहाणे आणि रचिन रवींद्र यांनी एक भन्नाट झेल घेतला. विराट कोहलीने लगावलेल्या शॉटचा सीमारेषेजवळ शानदार झेल टिपत त्याला बाद केले. आरसीबीच्या लागोपाठ विकेट पडत असताना संघाचा डाव सावरण्याची विराटवर जबाबदारी होती. पण मुस्तफिजूरच्या गोलंदाजीसमोर आरसीबीच्या फलंदाजांनी तर गुडघेच टेकले. या सामन्यातील विराटची विकेट तर पाहण्यासारखीच होती.
वेगवान गोलंदाज मुस्तफिझूर रहमानने कोहलीला शॉर्ट-पिच चेंडू टाकला. तो चेंडू फ्लिक करत कोहलीने पुल शॉट मारला. चेंडू षटकारासाठी जाणार असेच दिसत होते. चेंडू हवेत गेला आणि डीप मिड-विकेटवर असलेला अजिंक्य रहाणे त्याच्या झेल टिपण्यासाठी उजवीकडे धावत गेला आणि चेंडू पकडला. पण तो सीमारेषेवर पडणार हे त्याच्या लक्षात येताच त्याने चेंडू हवेत फेकला. चेंडू येताना पाहून तिथून रचिन पण धावत आला आणि रहाणेने त्याच्या दिशेने चेंडू फेकला जो रचिन पकडला आणि कोहली बाद झाला. ३५ वर्षीय अजिंक्य रहाणेने क्षेत्ररक्षणात आपली जादू दाखवली.
तत्त्पूर्वी आरसीबीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. फाफ डू प्लेसिसने या सामन्यात आरसीबीला वेगवान सुरुवात करून दिली. मात्र यानंतर चेन्नई सुपर किंग्जच्या गोलंदाजांची जादू पाहायला मिळाली. मुस्तफिजुर रहमानने त्याच्या पहिल्याच षटकात फाफ डू प्लेसिस आणि रजत पाटीदार यांना बाद केले. ग्लेन मॅक्सवेल बाद झाल्यानंतर विराट कोहली आणि कॅमेरून ग्रीनने डाव सावरू पाहत होते, पण ते दोघेही बाद झाले. विराट कोहलीने या सामन्यात १०५ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. त्याच्या बॅटमधून २० चेंडूत २१ धावा आल्या. त्यात केवळ एका षटकाराचा समावेश होता. १२व्या षटकात तो बाद झाला पण त्याला एकही चौकार मारता आला नाही.