Dinesh Kartik Hits Longest Six of IPL 2024: दिनेश कार्तिकने आयपीएल २०२४ मध्ये आपल्या फलंदाजीने दबदबा निर्माण केला आहे. फिनिशरच्या भूमिकेत असलेल्या दिनेश कार्तिकने प्रत्येक सामन्यात आपली जबाबदारी चोख पार पाडली आहे. कार्तिकने हैदराबादविरुद्धच्या सामन्यात ३५ चेंडूत ८३ धावांची खेळी केली, यादरम्यान त्याने ५ चौकार आणि ७ षटकार लगावले. कार्तिक त्याच्या या खेळीदरम्यान तुफानी फटकेबाजी करतात. याच सामन्यादरम्यान कार्तिकने १०८ मीटर लांब गगनचुंबी षटकार लगावला, जो आयपीएल २०२४ मधील सर्वात लांब षटकार आहे. कार्तिकचा हा षटकार इतका लांब होता की चेंडू स्टेडियमच्या छताला लागला.
– quiz
दिनेश कार्तिकने १६व्या षटकात टी. नटराजनच्या चेंडूवर फ्लिक शॉट खेळला आणि चेंडू थेट स्टेडिअमच्या छताला लागून पडला. हा षटकार १०८ मीटर लांब होता, या षटकारानंतर मैदानात एकच जल्लोष पाहायला मिळाला. याच सामन्यात, सनरायझर्स हैदराबाद संघाच्या डावात, हेनरिक क्लासेनच्या बॅटमधून १०६ मीटर लांब षटकार पाहायला मिळाला, जो आयपीएल २०२४ मधील दुसरा सर्वात लांब षटकार ठरला. याआधी या आयपीएलमध्ये निकोलस पुरनने १०६ मीटर लांब षटकार मारला होता. पण कार्तिकने एका फटक्यात हा विक्रम मोडून काढला आणि आता या मोसमात सर्वात लांब षटकार मारणारा खेळाडू बनला आहे.
IPL 2024 मध्ये सर्वात लांब षटकार लगावणारे फलंदाज
दिनेश कार्तिक- १०८ मीटर लांब षटकार
निकोलस पुरण- १०६ मीटर
हेनरिक क्लासेन – १०६ मीटर
व्यंकटेश अय्यर – १०६ मीटर
इशान किशन – १०३ मीटर
आंद्रे रसेल -१०२ मीटर
अभिषेक पोरेल – १०० मीटर
कार्तिकने या सामन्यात अवघ्या २३ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले, मात्र आपल्या खेळीने संघाला विजयापर्यंत नेण्यात त्याला यश आले नाही. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात खेळलेल्या खेळीच्या जोरावर कार्तिक या मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दहाव्या स्थानावर पोहोचला आहे. कार्तिकने आतापर्यंत ६ डावात ७५.३३ च्या सरासरीने २२६ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याचा स्ट्राइक रेट २०५.४५ आहे. या मोसमात आतापर्यंत कार्तिकच्या बॅटमधून १६ चौकार आणि १८ षटकार पाहायला मिळाले आहेत.
एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात रेकॉर्डब्रेक सामना पाहायला मिळाला. या सामन्यात आयपीएलच्या इतिहासातील अनेक जुने विक्रम मोडीत निघाले. या सामन्यात हैदराबाद संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत २८७ धावांचा डोंगर उभारला, तर या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबी संघाने कडवी झुंज देत २० षटकांत २६२ धावांपर्यंत मजल मारली, पण संघाने २५ धावांनी सामना गमावला.