SRH Team Owner Kaviya Maran Gets Angry: इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये गुरुवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबादमध्ये ४१ वा सामना खेळला गेला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादला ३५ धावांनी पराभवाचा सामना कराव लागला. पण, या विजयासह आरसीबीने एसआरएचकडून मागील पराभवाचा बदला घेतला. या सीझनमधील दुसरा विजय मिळाल्याने स्टार खेळाडू विराट कोहली खूप आनंदात होता. मात्र, दुसरीकडे सनरायझर्स हैदराबादची मालकीण काव्या मारन सामन्यादरम्यान चांगलीच संतापलेली दिसली. तिच्या रागावलेल्या चेहऱ्यावरील वेगवेगळ्या रिअॅक्शनचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सामना सुरू होण्यापूर्वी एसआरएच संघ विजयाचा प्रबळ दावेदार मानला जात होता. त्याने आरसीबीविरुद्धच्या मागील सामन्यात आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक धावसंख्या नोंदवून इतिहास रचला. तेव्हा एसआरएचची मालकीण काव्या मारन खूप खूश होती. पण, मॅच जस-जशी पुढे गेली तस- तसे तिच्या चेहऱ्यावरचं हसू गायब झाले.
काव्या मारनला राग अनावर
आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर विराट कोहली आणि रजत पाटीदार यांच्या अर्धशतकांच्या जोरावर स्कोरबोर्डवर २०६ धावा नोंदवल्या, यावेळी एसआरएच संघाची मालकीण काव्या मारन आनंदी दिसत होती, कारण तिच्या संघाची फलंदाजी अजून बाकी होती. या आयपीएलमध्ये विक्रम नोंदवणारे सनरायझर्सचे फलंदाज आरसीबीच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यात यशस्वी होतील असा तिचा विश्वास होता, पण क्रिकेटमध्ये कधी काय होईल हे कोणालाच माहीत नसते. यामुळे आरसीबीविरुद्धच्या मागील सामन्यात आनंदाने उड्या मारणारी काव्या यावेळी मात्र चांगली संतापलेली दिसली. सनरायझर्सच्या एकामागोमाग विकेट पडल्यानंतर जेव्हा जेव्हा कॅमेरा तिच्याकडे जायचा, तेव्हा ती खूप चिडलेली आणि संतापलेली दिसत होती.
सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये सनरायझर्स हैदराबादचा फलंदाज अब्दुल समाद आऊट होताच कॅमेऱ्याचा फोकस काव्या मारनवर गेला, यावेळी ती अतिशय रागावलेली दिसत होती. तिने हातवारे करून खेळाडूंवर आपला राग व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा जेव्हा एसआरएचचे फलंदाज बाद झाल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतत होते, तेव्हा तेव्हा ती खूप तणावात दिसली. तिच्या चेहऱ्यावर तो तणाव अगदी सहज दिसून येत होता.
आरसीबीविरुद्ध एसआरएच सामन्यात नेमकं काय घडले?
आरसीबीने प्रथम फलंदाजी करत एसआरएचला २०७ धावांचे लक्ष्य दिले. विराट कोहलीने ४३ चेंडूत ५१ धावांची खेळी केली, तर रजत पाटीदारने आपल्या खेळाने सर्वांचे मन जिंकले. उजव्या हाताच्या या फलंदाजाने २० चेंडूत ५० धावांची जलद खेळी केली. यावेळी पाटीदारने ५ षटकार आणि २ चौकार लगावले. प्रत्युत्तरात सनरायझर्स हैदराबादला २० षटकांत केवळ १७१ धावा करता आल्या आणि हा सामना ३५ धावांनी गमवावा लागला.