Kevin Pietersen shares Iran Israel Attack Incident ahead of MI vs CSK IPL 2024: भारतात सध्या आयपीएलचा माहोल असतानाच इराण आणि इस्रायल या दोन देशातील तणावात्मक परिस्थितीने पुन्हा लक्ष वेधलं. १४ एप्रिलला आलेल्या वृत्तानुसार इराणने त्यांच्या हद्दीतून इस्रायलवर ड्रोन आणि क्षेपणास्र हल्ला चढवला. इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार केविन पीटरसनने या क्षेपणास्रांच्या घटनेच्या प्रसंगाचा फार जवळून अनुभव घेतला आणि तेव्हा नेमकं काय घडलं, याची माहिती ट्विट करून दिली आहे.
आयपीएलमधील एल क्लासिको सामन्यासाठी मुंबईला परतताना पीटरसनसोबत ही घटना घडली. इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्रे डागली आणि त्यामुळे त्यांच्या विमानाला आपला मार्ग बदलून अधिक इंधन भरावे लागले. पीटरसनने हा प्रसंग सांगताना म्हटले, ‘असे आतापर्यंत कधीच घडले नव्हते. इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यापासून बचावण्यासाठी आमच्या विमानाला रात्री मार्ग बदलावा लागला. त्यासाठी विमाना पुन्हा परतावे लागले आणि अधिक इंधन भरावे लागले. आता मी मुंबईत आहे आणि थोड्याच वेळात वानखेडे स्टेडियमवर असेन, जे माझ्या आवडत्या क्रिकेट मैदानांपैकी एक आहे.’
केविन पीटरसन आयपीएल २०२४ च्या सुरुवातीला कॉमेंट्री करताना दिसले होते. पण या महिन्याच्या सुरुवातीला पीटरसन पुन्हा इंग्लंडला परतला होता. जवळपास दोन आठवडे कुटुंबासोबत घालवल्यानंतर तो पुन्हा एकदा कॉमेंट्रीच्या मैदानात परतला आहे. रविवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना होणार आहे. यात पीटरसन कॉमेंट्री करताना दिसणार आहे.