KKR vs DC Highlights: आयपीएलच्या १७व्या हंगामातील ४७वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला. ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने ७ गडी राखून विजय मिळवला. कोलकाता नाईट रायडर्सचा या मोसमातील हा सहावा विजय आहे. तर दिल्ली कॅपिटल्सला मोसमातील ५व्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. या विजयासह KKRचा संघ विशेष यादीत मुंबई इंडियन्ससह पहिल्या स्थानावर पोहोचला आहे.
दिल्लीने दिलेल्या १५४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआरकडून डावाची सलामी देण्यासाठी आलेल्या फिलिप सॉल्ट आणि सुनील नरेन यांनी संघाच्या विजयाचा पाया रचला. दोन्ही खेळाडूंनी पहिल्या विकेटसाठी ७९ धावांची भागीदारी केली. यादरम्यान फिलिप सॉल्टने ३३ चेंडूत ६८ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ७ चौकार आणि ५ षटकार लगावले. तर सुनील नरेनने १५ धावांची खेळी केली. या सामन्यात रिंकू सिंगला तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळाली, मात्र त्याला केवळ ११ धावा करता आल्या. त्यानंतर श्रेयस अय्यर (३३) आणि व्यंकटेश अय्यरने (२६) संघाला विजयापर्यंत नेले.
कोलकाता नाईट रायडर्सने शानदार कामगिरी करत ईडन गार्डन्स स्टेडियमवरील आपला ५१ वा विजय नोंदवला. यासह केकेआर संघ आयपीएलमध्ये एका मैदानावर सर्वाधिक सामने जिंकण्याच्या बाबतीत संयुक्तपणे प्रथम क्रमांकावर पोहोचला आहे. वानखेडे स्टेडियमवरही मुंबईने सर्वाधिक ५१ सामने जिंकले आहेत.
आयपीएलमध्ये एकाच मैदानावर सर्वाधिक विजय मिळवलेले संघ
५१ विजय – वानखेडेवर मुंबई इंडियन्स<br>५१ विजय – ईडन गार्डन्सवर केकेआर
५० विजय – चेन्नईमध्ये सीएसके
४१ विजय – बेंगळुरूमध्ये आरसीबी
वरुण चक्रवर्तीच्या नेतृत्वाखालील गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सला नऊ विकेट्सवर १५३ धावांवर रोखले. चक्रवर्तीने १६ धावांत तीन विकेट, हर्षित राणाने २८ धावांत २ आणि वैभव अरोराने २९ धावांत दोन विकेट घेतले. केकेआरच्या भेदक गोलंदाजीसमोर दिल्ली संघाने ठराविक अंतराने विकेट्स गमावल्या आणि संघाकडून कोणतीही मोठी भागीदारी करण्यात ते अपयशी ठरले.
सुनील नारायण आणि मिचेल स्टार्कनेही प्रत्येकी एक विकेट घेतली. त्याचवेळी नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या कुलदीप यादवने २६ चेंडूत नाबाद ३५ धावा केल्या, जी दिल्लीसाठी सर्वोच्च धावसंख्या होती.