आयपीएल २०२४ मधील आपल्या पहिल्याच सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने २०० अधिक धावांचा टप्पा गाठत हाहाकार उडवून दिला आहे. हैदराबादविरूध्दच्या सामन्यात कोलकाता संघाने नाणेफेक गमावल्याने संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला. सुरूवात चांगली झाल्यानंतर संघाने लागोपाठ ३ मोठे विकेट गमावले. पण आठव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेला केकेआरचा विस्फोटक फलंदाज आंद्रे रसरच्या २५ चेंडूत ७ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने २०८ धावांचा पल्ला गाठला. षटकार-चौकार लगावत रसलने संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेऊन ठेवले.
हैदराबाद संघाला विजयासाठी केकेआरने २०९ धावांचे आव्हान दिले आहे. कोलकाता संघाने अखेरच्या २९ चेंडूमध्ये १ विकेट गमावत तब्बल ८४ धावा कुटल्या. तत्तपूर्वी सलामीवीर फिल सॉल्ट आणि सुनील नारायण यांनी संघाला चांगली सुरूवात करून दिली पण नारायण
धावबाद झाला आणि संघाने एकामागून एक विकेट गमावले. व्यंकटेश अय्यर (७) आणि श्रेयस अय्यर (०)नटराजनच्या एकाच षटकात बाद झाले. नितीश राणा संघाचा डाव सावरू पाहत होता पण त्यालाही ९ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. मार्कंडेयने त्याला झेलबाद केले. त्यानंतर रमणदीप सिंगने धारदार फलंदाजी करत १७ चेंडूत ४ षटकार आणि एका चौकारासह ३५ धावा कुटल्या आणि संघाचा डाव सावरला तर फिल सॉल्ट एका बाजूला घट्ट पाय रोवून उभा होता.
रमणदीप सिंग कमिन्सकडून बाद झाल्यानंतर रिंकू सिंगने पहिल्याच चेंडूवर चौकार लगावत सुरूवात केली. फिल सॉल्टने केकेआरकडून पहिले अर्धशतक झळकावले आणि तो बाद झाला. त्यानंतर आंद्रे रसलने मैदानात येताच आपली ताबडतोड फलंदाजी केली. प्रत्येक गोलंदाजाच्या चेंडूवर त्याने थेट षटकार लगावले. तर रिंकू सिंगही त्याला मदत करत होता. अखेरच्या पाच षटकांमध्ये तर रसलने गियर बदलत तुफान फलंदाजी सुरू केली. रससने एकट्याने १९व्या षटकात २६ धावा केल्या आणि संघाची धावसंख्या २०० वर नेऊन ठेवली. सातव्या विकेटसाठी रसेल आणि रिंकूने ८१ धावांची भागीदारी केली. अखेरच्या षटकात रिंकू सिंग १५ चेंडूत २३ धावा करून बाद झाल्यानंतर स्टार्कने पहिल्याच चेंडूवर चौकार लगावला त्यानंतर १-१ धावा घेत संघाला २०८ धावांचा टप्पा पार करून दिला.
रसल या इनिंगसह आयपीएलमध्ये २०० षटकारांचा जलद टप्पा गाठणारा फलंदाज ठरला, त्याने फक्त ९७ डावांमध्ये २०० षटकार लगावले.