येत्या २२ मार्चपासून सुरू होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या २०२४ हंगामासाठी केएल राहुलला फिट घोषित करण्यात आले आहे. लखनऊ सुपर जायंट्स (LSG) कर्णधाराला बंगळुरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने फिट घोषित केल्याने तो पुढील दोन दिवसांत संघात सामील होईल. एलएसजी रविवारी जयपूरमध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे.
बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने राहुलला स्पर्धेच्या सुरुवातीच्या टप्प्यात विकेट कीपिंग न करण्याचा आणि तज्ञ फलंदाज म्हणून खेळण्याचा सल्ला दिल्याची माहिती मिळाली आहे.
“तो फिट आहे आणि येत्या काही दिवसांत तो त्याच्या आयपीएल फ्रँचायझीमध्ये सामील होऊ शकतो. त्याला क्वाड्रिसेप्समध्ये वेदना होत होत्या आणि त्याला एक इंजेक्शन देखील देण्यात आले होते. त्याचे पुनर्वसन झाले असून एनसीएने आता त्याला तंदुरुस्त घोषित केले आहे. यासोबतच त्याला लगेचच विकेटकीपिंग करू नये असा सल्ला देण्यात आला आहे,” असे भारतीय बोर्डाच्या एका सूत्राने सांगितले.
इंग्लंडविरूध्दच्या हैदराबाद कसोटीनंतर राहुलने उजव्या क्वाड्रिसेप्समध्ये वेदना होत असल्याची तक्रार केली आणि नंतर इंग्लंडविरुद्धच्या घरच्या संपूर्ण मालिकेतून तो बाहेर पडला. बीसीसीआयने सुरुवातीला सांगितले होते की राहुल सामना खेळण्यासाठी ९० टक्के फिट आहे आणि बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली त्याची प्रगती चांगली होत आहे. पण नंतर त्यांनी इंग्लंडमधील तज्ज्ञांचा सल्ला घ्यायचे ठरवले आणि तज्ज्ञांचे मत जाणून घेण्यासाठी राहुल परदेशात गेला.
दरम्यान, रणजी ट्रॉफी सामन्यातील शेवटचे दोन दिवस न खेळलेल्या श्रेयस अय्यरला रविवारी आयपीएल खेळण्यासाठी फिट घोषित करण्यात आले. पण याचसोबत श्रेयसला सल्लाही देण्यात आला की फॉरवर्ड डिफेन्स खेळताना त्याने पुढच्या पायावर जास्त जोर देऊ नये, अन्यथा त्याची दुखापत अधिक बळावेल.
इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, अय्यरने नॅशनल क्रिकेट अकादमी मध्ये चर्चा केल्यानंतर मुंबईतील मणक्याच्या तज्ज्ञांना भेट दिली आणि डॉक्टरांनी त्याला पाय स्ट्रेच करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, असा सल्ला दिला.