Delhi Capitals beat Lucknow Supergiants by 6 wickets : आयपीएल २०२४ मधील २६वा सामना शुक्रवारी लखनऊ येथे पार पडला. या सामन्यात लखनऊ सुपरजायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमनेसामने होते. ज्यामध्ये दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपरजायंट्सवर ६ विकेट्सनी विजय मिळवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना लखनऊने आयुष बडोनीच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर दिल्लीसमोर १६८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र, प्रत्युत्तरात दिल्लीने पदार्पणवीर जेक फ्रेझर मॅकगर्कच्या अर्धशतकाच्या जोरावर ४ गडी गमावून विजयावर शिक्कामोर्तब केला.
मॅकगर्कने पदार्पणाच्याच सामन्यात झळकावले अर्धशतक –
१६८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या दिल्लीची सुरुवात चांगली झाली नाही. कारण डेव्हिड वॉर्नर केवळ ८ धावा करून बाद झाला. त्याच्यानंतर पृथ्वी शॉने जबाबदारी स्वीकारली, पण मागील सामन्याप्रमाणे त्याला अर्धशतक झळकावता आले नाही. तो २२ चेंडूत ३२ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. दिल्लीने पूर्वार्धात अतिशय संथ फलंदाजी केली, मात्र त्यानंतर ऋषभ पंत आणि नवोदित जेक फ्रेझर मॅकगर्क यांनी तुफानी शैलीत फलंदाजी केली. एकीकडे पंतने २४ चेंडूत ४१ धावांची खेळी खेळली, ज्यात त्याने ४ चौकार आणि २ षटकार मारले. तर मॅकगर्कने ३५ चेंडूत ५५ धावा केल्या. त्याने २ चौकार आणि ५ षटकारही मारले.
दिल्ली कॅपिटल्सची पहिल्या १० षटकांत धावसंख्या २ बाद ७५ धावा होती, पण येथून डीसीच्या फलंदाजांनी वेग पकडण्यास सुरुवात केली. ऋषभ पंत आणि मॅकगर्क यांनी पुढच्या २४ चेंडूत ६१ धावा केल्या आणि ४ षटकांच्या या कालावधीत दोघांनी मिळून ५ गगनचुंबी षटकार आणि ४ चौकार लगावले. पण पंधराव्या षटकात मॅकगर्क आणि पुढच्याच षटकात ऋषभ पंत बाद झाल्याने सामना अडकलेला दिसत होता. पंत आणि मॅकगर्क यांच्यात ७७ धावांची भागीदारी झाली. दिल्लीला २ षटकात फक्त १० धावा हव्या होत्या. त्यावेळी शाई होप आणि ट्रिस्टन स्टब्स यांनी घाई न करता ११ चेंडू शिल्लक असताना दिल्लीचा ६ गडी राखून विजय मिळवून दिला. लखनऊकडून रवी बिश्नोईने दोन तर नवीन-उल-हक आणि यश ठाकूर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
हेही वाचा – T20 World Cup : ‘मला आशा आहे की विराट कोहलीची निवड होणार नाही’, आरसीबीच्या ‘या’ खेळाडूचे चकित करणारे वक्तव्य
सामन्यात युवा खेळाडूंचे राहिले वर्चस्व –
लखनौ आणि दिल्ली यांच्यातील या सामन्यात युवा खेळाडूंनी वर्चस्व गाजवले. तत्पूर्वी, लखनऊने अवघ्या ७४ धावांत ७ विकेट्स गमावल्या होत्या, मात्र त्यानंतर आयुष बडोनीने ३५ चेंडूत ५५ धावा केल्या आणि अर्शद खाननेही १६ चेंडूत २० धावा करत लखनौला १६७ धावांपर्यंत पोहोचवले. दिल्लीकडून कुलदीप यादवने शानदार गोलंदाजी केली. त्याने ४ षटकात २० धावा देत ३ विकेट्स घेतल्या. खलील अहमदने २ विकेट्स घेतल्या. मुकेश कुमार आणि इशांत शर्मा यांना प्रत्येकी एक विकेच घेतली. दरम्यान, अर्शद खाननेही गोलंदाजीत आपली लाईन, लेन्थ आणि गतीने प्रभावित केले. दुसरीकडे, दिल्लीकडून जेक फ्रेझर मॅकगर्कने पदार्पणाच्याच सामन्यात ५५ धावांची शानदार खेळी करत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.