आयपीएल २०२४ च्या ५५ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादचा ७ गडी राखून पराभव केला. वानखेडे स्टेडियमवर झालेला हा सामना सूर्यकुमारसाठी खूप खास होता. सूर्यकुमार यादवने आपल्या तुफानी फलंदाजीने अवघ्या ५१ चेंडूत नाबाद शतक झळकावले आणि मुंबई इंडियन्सला एकतर्फी विजय मिळवून दिला. या शतकाबरोबर त्याने अनेक विक्रमही मोडीत काढले. मुंबईसाठी सर्वाधिक आयपीएल शतके झळकावणारा तो फलंदाज ठरला. सूर्यकुमारच्या या उत्कृष्ट खेळीने चाहतेही खूप खुश झाले, यात अनेक माजी क्रिकेटपटू सोशल मीडियावर पोस्ट करत सूर्यकुमार यादवचे कौतुक करत आहेत.
चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या सूर्याने ५१ चेंडूंत १२ चौकार आणि ६ षटकार ठोकले आणि २०० च्या स्ट्राईक रेटने नाबाद १०२ धावा केल्या. त्याची ही धमाकेदार खेळी पाहून दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटूही आनंदी झाला आहे. सूर्याची दमदार खेळी पाहिल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटर वेन पार्नेलने एक्सवर एक मजेदार पोस्ट केली. त्याने या पोस्टमध्ये लिहिले की, “सूर्यकुमार यादव याची डीएनए टेस्ट कोणी केली आहे का? हा खेळाडू खूप वेगळा, एकदम वेगळा आहे.”
वेन पार्नेल हा दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी क्रिकेटपटू आहे. त्याने वनडेत ९९, टी-20 मध्ये ५९ आणि कसोटीत १५ विकेट घेतल्या आहेत. वेन पार्नेल हा आयपीएलमध्ये आरसीबीचा खेळाडू आहे. त्याने ३३ सामन्यांत ३५ विकेट घेतल्या आहेत. गेल्या मोसमात पार्नेलने ७ सामन्यात ९ विकेट घेतल्या होत्या.
‘संकटमोचक’ सूर्या
सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, सनरायझर्स हैदराबादने दिलेल्या १७५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची सुरुवात चांगली झाली नाही. संघाचे तीन फलंदाज केवळ ३१ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतले होते. यानंतर सूर्यकुमारने टिळक वर्माबरोबर मोठी शतकी भागीदारी करत मुंबईला विजयापर्यंत नेले. दोघांमध्ये १४३ धावांची भागीदारी झाली. सूर्यकुमार यादवने स्फोटक शैली दाखवत १२ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने नाबाद १०२ धावांची खेळी केली. त्याने षटकार ठोकत शानदार शतक झळकावले. त्याचे एकामागून एक षटकार पाहून संपूर्ण वानखेडे स्टेडियम जल्लोषाने भरून गेले. सूर्यानेही स्टायलिश शैलीत शतक पूर्ण केले.
सोशल मीडियावर कमेंट्सचा महापूर
सूर्यकुमारची ही खेळी पाहून सोशल मीडियावर कमेंट्सचा महापूर आला आहे. फॅन्स आपापल्या स्टाइलमध्ये पोस्ट शेअर करत आहेत. यासह अनेक क्रिकेटर्सदेखील सूर्याच्या खेळीचे कौतुक करत आहेत.