IPL 2024, Punjab Kings vs Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद रोहित शर्माऐवजी हार्दिक पंड्याकडे दिल्यापासून मुंबईच्या ताफ्यात सारं काही अलबेल नसल्याच्या बातम्या समोर येत आहेत. मुंबईचे चाहतेही मुंबईच्या या निर्णयावर नाखूश असून सामन्यांमध्ये पंड्याची हुर्या उडवताना दिसतात. १८ एप्रिलला मुंबई इंडियन्स वि पंजाब किंग्समध्ये झालेल्या सामन्यानंतर मोहम्मद नबीने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली होती पण थोड्यावेळाने ती डिलीट केली, ज्यामध्ये पंड्याच्या कर्णधारपदावर टीका करण्यात आली होती.
मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या ३३व्या सामन्यात पंजाब किंग्जचा ९ धावांनी पराभव केला. एमआयच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला. विशेषत: जसप्रीत बुमराह आणि गेराल्ड कोएत्झी यांनी संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आणि प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. मात्र, सामन्यादरम्यान कर्णधार हार्दिक पंड्याने अफगाणिस्तानचा अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नबीला एकही षटक टाकण्याची संधी मिळाली नाही.
नबीला एकही षटक न दिल्याबद्दला चाहत्यांनी आणि क्रिकेट तज्ज्ञांनीही प्रश्न उपस्थित केले आहेत. दरम्यान, मोहम्मद नबीने पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात कर्णधार हार्दिक पांड्याला षटक न दिल्याबद्दल टीका करणारी एक इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट केली होती, परंतु नंतर त्याने ही इन्स्टा स्टोरी नंतर डिलीट केली. मात्र ही स्टोरी डिलीट करण्याआधीच नबीच्या इन्स्टाग्राम स्टोरीचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पंजाबविरूद्धच्या सामन्यात नबीने दोन शानदार झेल टिपले आणि एक धावबादही केले. मोहम्मद नबीने टूर्नामेंटच्या चालू हंगामात आतापर्यंत ६ षटके टाकली आहेत, ज्यामध्ये त्याने ४३ धावा दिल्या आहेत. पण त्याला अद्याप एकही विकेट मिळालेली नाही.