IPL 2024, Mumbai Indians vs Chennai Super Kings: वानखेडे आणि धोनीचे षटकार हे समीकरण आपण पू्र्वीपासून पाहत आलो आहोत, याचाच प्रत्यय पुन्हा एकदा चेन्नई विरूद्ध मुंबईच्या सामन्यात आला. धोनीने चेन्नईच्या डावातील २०व्या षटकात षटकारांची हॅटट्रिक साधली. धोनीच्या या षटकारांनी चेन्नई सुपर किंग्जला मुंबई इंडियन्सविरुद्ध २ धावांनी विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पण या षटकारांनंतर धोनीने पुन्हा एकदा चाहत्यांची मने जिंकली. ड्रेसिंग रूममध्ये परतत असलेल्या धोनीने समोरचा चेंडू उचलत छोट्या चाहतीला दिला.
– quiz
पहिल्या डावातील षटकारांच्या आतिषबाजीनंतर धोनी ड्रेसिंग रूमच्या दिशेने पायऱ्या चढत असताना धोनीला तिथे एक चेंडू मिळाला. पंड्याच्या गोलंदाजीवर षटकार लगावलेला तो चेंडू होता, त्याने पायऱ्यांवरून तो चेंडू उचलला आणि प्रेक्षकांमध्ये बसलेल्या लहान मुलीला दिला. धोनीची विस्फोटक फलंदाजी पाहणं, हे त्याच्या प्रत्येक चाहत्याची इच्छा असते. या सामन्यातही अखेरच्या षटकात फलंदाजीला धोनी येताच वानखेडेवर एकच जल्लोष झाला. धोनीनेही चाहत्यांना नाराज न करता आपल्या जुन्या अंदाजात षटकारांचा पाऊस पाडला.
यंदाचा आयपीएल हंगाम हा धोनीचा अखेरचा हंगाम असू शकतो. त्यामुळे वानखेडेवरीलही धोनीचा हा अखेरचा सामना होता आणि धोनीने तो अधिक स्मरणीय बनवला. वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात, धोनी पहिल्या डावाच्या शेवटच्या षटकात फलंदाजीला आला आणि चार चेंडूत त्याने हार्दिक पांड्याला लागोपाठ तीन षटकार लगावले, ज्यामुळे CSK ची धावसंख्या २० षटकांत २०० पार गेली. रोहित शर्माने संघासाठी ६३ चेंडूत १०५ धावांची नाबाद खेळी खेळली, पण संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.
सामन्यानंतर सीएसकेचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने धोनीच्या सामन्यातील प्रभावी कामगिरीचे कौतुक केले. तो म्हणाला- “विकेटकीपरच्या (धोनीने) त्या तीन षटकारांची संघाला खूप मदत झाली, ज्यामुळे धावांमध्ये मोठा फरक पाहायला मिळाला. या मैदानावर आम्हाला १०-१५ अतिरिक्त धावांची गरज होती. बुमराहने सामन्यातील मधल्या षटकांत चांगली गोलंदाजी केली. मला वाटते की आम्ही गोलंदाजीसह आमचे डावपेच अचूकपणे वापरले.”