Ruturaj Gaikwad Replaces MS Dhoni As CSK Captain in IPL 2024: चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने आयपीएल सुरू होण्याच्या एक दिवस आधी सर्वात मोठा धक्का दिला. चेन्नईचा नियमित कर्णधार एम एस धोनीने त्याचे कर्णधारपद युवा सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाडकडे सोपवले आहे. त्यामुळे यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाचा नवा कर्णधार हा मराठमोळा ऋतुराज गायकवाड असणार आहे. सीएसकेचा पहिला सामना शुक्रवारी एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबीविरुद्ध होणार आहे. कॅप्टन्सच्या फोटोशूटनंतर चेन्नई संघाच्या ऑफिशियल ट्विटर अकाऊंटवरून ही घोषणा करण्यात आली आहे.

धोनीने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती आणि लिहिले होते की, यावेळी तुम्ही त्याला एका नवीन भूमिकेत पाहणार आहात आणि त्याने हा निर्णय घेऊन चाहत्यांना आश्चर्यचकित केले आणि संघाचे कर्णधारपद सोडले. यावेळी धोनी सीएसकेसाठी यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून खेळताना दिसणार असून ऋतुराज त्याच्या देखरेखीखाली ही जबाबदारी सांभाळणार आहे.

सीएसकेला पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवून देणारा महेंद्रसिंग धोनी आगामी हंगामात संघाचे नेतृत्व करताना दिसणार नाही. धोनीने ही जबाबदारी सोडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी आयपीएल २०२२ मध्येही संघ व्यवस्थापनाने कर्णधारपदात बदल केले होते. धोनीच्या जागी स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाला कर्णधार बनवण्यात आले.

मात्र जडेजा ही जबाबदारी नीट पार पाडू शकला नाही आणि संघाला साखळी सामन्यांमध्येच दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे त्याने हंगामाच्या मध्यातच संघ सोडला आणि कर्णधारपदाचाही राजीनामा दिला. यानंतर धोनीने पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा सांभाळली. गेल्या मोसमात संघाने पाचवे विजेतेपद पटकावले.

धोनीने आयपीएलच्या आगामी हंगामासाठी कर्णधारांच्या फोटोशूटलाही हजेरी लावली नाही. त्याच्या जागी ऋतुराज गायकवाड दिसला, तेव्हापासून CSK च्या कर्णधार बदलाची चर्चा सुरू झाली होती. गुरुवारी आयपीएलने आपल्या अधिकृत पोस्टमध्ये पुष्टी केली की धोनीच्या जागी चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व ऋतुराज गायकवाड करणार आहे. त्याचबरोबर आयपीएलच्या आगामी हंगामापूर्वी पंजाब किंग्जनेही मोठा निर्णय घेत जितेश शर्माला संघाचा उपकर्णधार बनवले आहे. शिखर धवनच्या जागी तो कर्णधारांसोबत फोटोशूट करताना दिसला.

Story img Loader