IPL 2024 GT vs CSK : आयपीएल २०२४ मधील ५९ वा सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला गेला. गुजरातने हा सामना ३५ धावांनी जिंकून प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा जिवंत ठेवल्या. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला पराभवाला सामोरे जावे लागले. असे असले तरी पुन्हा एकदा एम. एस. धोनीची झंझावाती फलंदाजी चाहत्यांना पाहायला मिळाली. दरम्यान, या सामन्यातही धोनी पुन्हा एकदा आठव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. धोनीने मैदानात एन्ट्री घेताच चाहत्यांमध्ये एक वेगळाच उत्साह पाहायला मिळाला. यावेळी फलंदाजी करताना धोनीने तीन षटकार ठोकले. या लाइव्ह सामन्यादरम्यान धोनीच्या एका चाहत्याने सुरक्षा भेदून चक्क मैदानात धाव घेतली. त्यानंतर त्याने जे काही केले, ते पाहून चाहतेदेखील भारावून गेले. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
चाहत्याने धरले ‘थला’चे पाय
या सामन्यात एम. एस. धोनीने २६ धावांची नाबाद खेळी केली. धोनीने या खेळीत तीन शानदार षटकारही मारले. त्यापैकी राशिद खानच्या षटकात माहीने लागोपाठ दोन षटकार ठोकले. धोनी सामन्याच्या शेवटच्या षटकात फलंदाजी करीत असताना स्टेडियममधील एक चाहता सुरक्षा भेदून थेट मैदानात घुसला आणि त्याने चक्क धोनीचे पाय धरले. त्यानंतर धोनीनेही त्याला मिठी मारली आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवून तो चालू लागला. त्यानंतर सुरक्षा रक्षकाने तिथे येऊन, त्या चाहत्याला बाहेर काढले. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
CSK चा सहावा पराभव
या सामन्यात गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत तीन गडी गमावत २३२ धावा केल्या. या सामन्यात गुजरातकडून कर्णधार शुभमन गिल व साई सुदर्शन या दोघांनी शतके झळकवली. फलंदाजी करताना गिलने ५१ चेंडूंत १०३ धावा केल्या. आपल्या खेळीदरम्यान शुभमनने पाच चौकार आणि सात शानदार षटकार मारले. त्याशिवाय साई सुदर्शनने ५५ चेंडूंत १०४ धावांची खेळी केली. साईने आपल्या खेळीत नऊ चौकार आणि सहा षटकार मारले.
२३२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना CSK संघ २० षटकांत आठ गडी गमावून १९८ धावाच करू शकला. या सामन्यात सीएसकेची टॉप ऑर्डर फ्लॉप ठरली. कर्णधार गायकवाडला सामन्यात खातेही उघडता आले नाही. सीएसकेकडून फलंदाजी करताना डॅरिल मिशेलने सर्वाधिक ६३ धावांची खेळी केली. त्याशिवाय मोईन अलीने ५६ धावा केल्या. या हंगामामधील १२ सामन्यांमधला चेन्नईचा हा सहावा पराभव आहे.