IPL 2024, Mumbai Indians vs Delhi Capitals: आयपीएल २०२४ मध्ये मुंबई इंडियन्स संघाने दिल्ली कॅपिटल्सचा २९ धावांनी पराभव करत यंदाच्या मोसमातील पहिला विजय नोंदवला आहे. दिल्लीविरूद्धच्या या विजयासह १५० टी-२० सामने जिंकणारा मुंबई इंडियन्स हा पहिला संघ ठरला आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सने अष्टपैलू कामगिरी केली. प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सला २३४ धावांचे लक्ष्य दिले, त्याला प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्सचा संघ २०५ धावाच करू शकला. मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध काही विक्रमांची नोंद केली आहे, त्याचा आढावा घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध केलेल्या २३४ धावा ही मुंबई इंडियन्सची आयपीएलच्या इतिहासातील तिसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. या हंगामाच्या सुरुवातीला मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध २३६ धावा केल्या होत्या. जी त्यांची आयपीएलमधील सर्वात मोठी धावसंख्या आहे. याशिवाय मुंबई इंडियन्स संघाने २४व्यांदा आयपीएलमध्ये २०० हून अधिक धावा केल्या आहेत.

आयपीएलमधील मुंबई इंडियन्सची सर्वात मोठी धावसंख्या:
२४६/५ ​​वि सनरायझर्स हैदराबाद, हैदराबाद, २०२४
२३५/९ वि सनरायझर्स हैदराबाद, अबू धाबी, २०२१
२३४/५ वि दिल्ली कॅपिटल्स, वानखेडे, २०२४*
२२३/६ वि पंजाब किंग्ज, वानखेडे, २०१७

मुंबई इंडियन्सच्या नावे हा विक्रम

टी-२० क्रिकेटच्या इतिहासात मुंबई इंडियन्स हा पहिलाच संघ बनला आहे. ज्याने २३० पेक्षा जास्त मोठी धावसंख्या उभारली पण तरीही कोणत्याही फलंदाजाने अर्धशतकही केले नाही. यापूर्वी सॉमरसेट संघाने केंटविरुद्ध २२६ धावा केल्या होत्या. त्यानंतरही सॉमरसेटच्या एकाही फलंदाजाने अर्धशतक झळकावले नव्हते.

एकाही खेळाडूचे अर्धशतक नाही

दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. प्रथम फलंदाजी करताना संघाने २३४ धावा केल्या. मात्र मुंबई इंडियन्सच्या एकाही खेळाडूला अर्धशतक झळकावता आले नाही. मुंबईकडून रोहित शर्माने सर्वाधिक ४९ धावा केल्या. इशान किशनने ४२ धावांचे योगदान दिले. कर्णधार हार्दिक पंड्याने ३९ धावा केल्या. टीम डेव्हिड आणि रोमारियो शेफर्ड यांनी शेवटच्या षटकांमध्ये शानदार फलंदाजी केली, ज्यामुळे मुंबई संघ एवढी मोठी धावसंख्या उभारू शकला. टीम डेव्हिडने २१ चेंडूत ४५ धावा तर शेफर्डने १० चेंडूत ३९ धावा केल्या. रोमारियो शेफर्डने शेवटच्या षटकात एनरिक नॉर्कियाविरुद्ध ३२ धावा केल्या. याच कारणामुळे मुंबई संघाला २३४ धावांचा डोंगर उभा करता आला.

आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा २०० पेक्षा जास्त धावा करणारे संघ
२९ – चेन्नई सुपर किंग्ज<br>२४ – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
२४ – मुंबई इंडियन्स
२२- पंजाब किंग्ज
२१ – कोलकाता नाईट रायडर्स

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2024 mumbai indians 3rd highest total without any half century of player mi vs dc bdg