जयपूर : मुंबई इंडियन्सचा सामना सोमवारी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमध्ये गुणतालिकेत अग्रस्थानी असणाऱ्या राजस्थान रॉयल्स संघाशी होणार आहे. या सामन्यात मुंबईच्या गोलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
गेल्या चार सामन्यांत मुंबईच्या संघाने तीन सामन्यांत विजय मिळवला आहे. हंगामाच्या खराब सुरुवातीनंतर गुणतालिकेत ते सहाव्या स्थानी पोहोचले आहेत. तर, राजस्थान रॉयल्सचा संघ चांगल्या लयीत असून १२ गुणांसह ते शीर्षस्थानी आहेत. राजस्थानविरुद्ध विजय मिळवायचा झाल्यास मुंबईला सर्वच विभागांत कामगिरी उंचवावी लागेल.
हेही वाचा >>> PBKS vs GT : गुजरात टायटन्सचा पंजाब किंग्जवर ३ विकेट्सनी विजय, राहुल तेवतिया-साई किशोरचे शानदार प्रदर्शन
बुमरावर गोलंदाजीची मदार
पाच जेतेपद मिळवणाऱ्या मुंबईने गेल्या सामन्यात आशुतोष शर्माने झळकावलेल्या अर्धशतकानंतरही पंजाब किंग्जविरुद्ध नऊ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात जसप्रीत बुमराने तीन गडी बाद केले. सध्या बुमरा १३ बळींसह ‘आयपीएल’मध्ये अधिक बळी मिळवणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत शीर्षस्थानी आहे. मात्र, बुमराला इतर गोलंदाजांकडून म्हणावी तशी साथ मिळालेली नाही. गेराल्ड कोएट्झीने १२ फलंदाजांना माघारी धाडले आहे. पण, त्याने खूप धावा दिल्या आहेत. आकाश मढवाल व कर्णधार हार्दिक पंडयालाही कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही. फलंदाजांमध्ये माजी कर्णधार रोहित शर्मा चांगल्या लयीत आहे. मात्र, तरीही संघ पराभूत झाला. इशान व हार्दिक यांना चमक दाखवण्यात अपयश आले. सूर्यकुमार यादव लयीत असणे ही मुंबईच्या दृष्टीने सर्वात जमेची बाजू आहे.
बटलर, बोल्टकडे लक्ष
राजस्थानने मुंबईविरुद्धच्या गेल्या सामन्यात चमक दाखवली होती. ट्रेंट बोल्टने त्यांच्या फलंदाजांना अडचणीत आणले होते. त्यामुळे या सामन्यातही त्याच्याकडून याच कामगिरीची अपेक्षा असेल. यजुवेंद्र चहलने १२ गडी बाद करत संघासाठी चमक दाखवली आहे. मात्र, रविचंद्रन अश्विन अडचणीत दिसत आहे. फलंदाजी रियान परागने आतापर्यंत ३१८ धावा केल्या आहे. कर्णधार संजू सॅमसननेही २७६ धावा करत आपले योगदान दिले आहे. जोस बटलरने कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध आपल्या खेळीच्या जोरावर संघाला विजय मिळवून दिला होता. मात्र, सलामीवीरात यशस्वी जैस्वालची लय संघाच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे. त्यामुळे मुंबईविरुद्ध तो कामगिरी करण्यास उत्सुक असेल. शिम्रॉन हेटमायरही आक्रमक खेळ करत आहे.
* वेळ : सायं. ७.३० वा. * थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी, जिओ सिनेमा.