हैदराबाद : मुंबई इंडियन्स व सनरायजर्स हैदराबाद या संघांना इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) सुरुवातीच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. बुधवारी जेव्हा दोन संघ एकमेकांविरुद्ध खेळतील तेव्हा त्यांचे लक्ष्य हे विजय मिळवण्याचे राहील.
पाच जेतेपद मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाची सुरुवात हे नेहमीप्रमाणेच चांगली झाली नाही. गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात चांगल्या स्थितीत असतानाही त्यांना पराभूत व्हावे लागले. या सामन्यात जसप्रीत बुमराचा प्रभावी मारा, युवा डेवाल्ड ब्रेविसची आक्रमक फलंदाजी व रोहित शर्माची खेळी या संघासाठी जमेच्या बाजू होत्या. मुंबईला एकवेळ विजयासाठी ३६ चेंडूंत ४८ धावांची आवश्यकता होती. मात्र, संघाला तरीही पराभवाचा सामना करावा लागला. ही संघ व्यवस्थापनाच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. प्रथमच मुंबईच्या संघाचे नेतृत्व करताना सातव्या क्रमांकावर हार्दिक फलंदाजीसाठी उतरला. पण, संघाचा हा निर्णय पथ्यावर पडला नाही. गेल्या हंगामात गुजरात टायटन्सकडून त्याने वरच्या स्थानी खेळताना प्रभाव पाडला होता. मुंबईकडे शम्स मुलानी व पियूष चावलाच्या रूपात फिरकीपटूंचे पर्याय उपलब्ध आहेत. त्यांच्यासमोर कामगिरी उंचावण्याचे आव्हान असेल.
हेही वाचा >>> IPL 2024: रोहित शर्माला पुन्हा मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद मिळेल का? माजी दिग्गजाचे मोठे विधान
क्लासन, मयांककडे लक्ष
पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील सनरायजर्स हैदराबाद संघाने कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात हेन्रिक क्लासनच्या आक्रमक खेळीने एकवेळ विजय जवळपास निश्चित केला होता. मात्र, क्लासनला इतर फलंदाजांची पुरेशी साथ न मिळल्याने संघाला पराभूत व्हावे लागले. मयांक अगरवाल व अभिषेक शर्मा या सलामीच्या जोडीने संघाला चांगली सुरुवात दिली होती. मात्र, त्यांना कामगिरीत सातत्यता राखणे गरजेचे आहे. हैदराबाद संघाने अब्दुल समदवर विश्वास दाखवला आहे. त्यासाठी त्याला आपली कामगिरी उंचवावी लागेल. गोलंदाजीत भुवनेश्वर कुमारने गेल्या सामन्यात चांगली कामगिरी केली होती. मात्र, आंद्रे रसेलने नंतर त्याच्या गोलंदाजीवर आक्रमक फटके मारले. भुवनेश्वरला टी. नटराजनकडून साथ मिळेल.
* वेळ : सायं. ७.३० वा.
* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी, जिओ सिनेमा.
रोहित, इशानकडून अपेक्षा
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संघाने पाच जेतेपद मिळवले आहेत. यंदा मात्र, नेतृत्वाची धुरा हार्दिक पंडया सांभाळत असून रोहितला कोणतेही दडपण नाही. त्यामुळे तो आपला आक्रमक खेळ करू शकतो. पहिल्या सामन्यातही त्याने आपल्या खेळाचे सर्वांचे लक्ष वेधले होते. या सामन्यातही मुंबईला चांगली सुरुवात करायची झाल्यास रोहितकडून मोठया खेळीची अपेक्षा राहील. सलामीवीर इशान किशनला गेल्या सामन्यात केवळ चार चेंडूंचा सामना करता आला होता. त्यामुळे या सामन्यात त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. ट्वेन्टी-२० विश्वचषक पाहता त्याला भारतीय संघात स्थान मिळवायचे झाल्यास फलंदाज व यष्टिरक्षक म्हणून प्रभाव पाडावा लागेल.