IPL 2024 च्या पहिल्याच सामन्यात इशांत शर्माला दुखापत झाली. क्षेत्ररक्षण करताना इशांतला दुखापत झाली आणि तो वेदनेने कळवळताना दिसला. इशांतला नीट उभे राहायला जमत नसल्याने त्याला मैदानाबाहेर जावे लागले. इशांतची दुखापत ही दिल्ली कॅपिटल्ससाठी वाईट बातमी ठरली. ज्याचा फटका दिल्लीला सामन्यात बसला आणि डेथ ओव्हर्समध्ये संघात जबरदस्त गोलंदाज नसल्याने पंजाब संघाने सहज विजय मिळवला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात संघाचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माच्या पायाला दुखपत झाली. इशांतला ही दुखापत गोलंदाजी करताना नाही तर क्षेत्ररक्षण करताना झाली. तो मिड-विकेटवर क्षेत्ररक्षण करत होता. चेंडू अडवताना त्याचा पाय मुरगळला. वेदनेने कळवळत इशांत मैदानावर पडून होता. फिजिओने मैदानात येऊन इशांतला तपासले आणि त्याला बाहेर जावे लागले.

इशांत शर्माला चालायलाही जमत नव्हते. टीम फिजिओशिवाय इशांतला आणखी एका साथीदाराच्या मदतीने मैदानाबाहेर जावे लागले. दिल्ली कॅपिटल्सच्या डावाच्या सहाव्या षटकात ही घटना घडली. सीमारेषेवर चेंडू रोखण्याच्या प्रयत्नात इशांतचा तोल गेला. इशांतने बाहेर जाण्यापूर्वी फक्त दोनच षटके टाकली होती. त्याची दुखापत आणि वेदना पाहता तो या सामन्यात गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा मैदानात आला नाही. इशांत आणखी काही सामन्यांमधून बाहेर पडण्याची शक्यता आहे.

शिखर धवनला केले क्लीन बोल्ड

इशांत शर्माकडून गोलंदाजीला चांगली सुरूवात झाली नाही पण त्याने संघाला मोठी विकेट मिळवून दिली. त्याने पहिल्या चार चेंडूंमध्ये तीन वाईड टाकले आणि एक चौकारदेखील मिळाला. पण त्यानंतर पुढच्या षटकात शिखर धवनला क्लीन बोल्ड केले. इशांतने त्याच्या दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर धवनला पॅव्हेलियनमध्ये धाडले. त्याच्यामुळे दिल्ली कॅपिटल्सला त्याच षटकाच्या चौथ्या चेंडूवर दुसरी विकेट मिळाली. प्रभसिमरन सिंगने समोर शॉट खेळला. जो इशांतच्या हाताला लागला आणि थेट विकेटवर आदळला. जॉनी बेअरस्टो क्रीझच्या बाहेर असल्याने बाद झाला आणि त्यालाही पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले.

अशारितीने इशांतने बाहेर जाण्यापूर्वी संघाला दोन महत्त्वाच्या विकेट्स मिळवून दिल्या. इशांतच्या दुखापतीमुळे दिल्लीसाठी सहज दिसणारा विजय पंजाबने हिसकावून घेतला. मिचेल मार्शच्या गोलंदाजीवर पंजाबने धावांचा पाऊस पाडला. इशांत शर्माच्या रूपात एक अनुभवी गोलंदाज नसल्याने धावांचा बचाव करणे संघासाठी मोठा टास्क होता, खलील अहमदने तसा प्रयत्न केला पण अखेरच्या षटकात सामना हातून निसटला.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2024 pbks vs dc ishant sharma injured in 1st match affects delhi capitals bdg