यंदाच्या आयपीएलमध्ये आता प्लेऑफमध्ये जाण्यासाठी फक्त एकच जागा शिल्लक आहे. कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ प्लेऑफसाठी आधीच पात्र ठरले आहेत. आता फक्त एका जागेसाठी चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन संघांमध्ये मोठी चुरस आज रंगणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल २०२४ मध्ये शानदार पुनरागमन केले आहे. सलग ५ सामने जिंकून त्यांनी प्ले ऑफच्या शर्यतीत स्वत:ते स्थान कायम ठेवले आहे. पण प्लेऑफसाठी पात्रता मिळवणं त्याच्यासाठी सोपे असणार नाही. आता त्यांना सामना जिंकण्यासाठी गणितीय समीकरणाप्रमाणे सामना खेळावा लागणार आहे. अशा परिस्थितीत, RCB संघ प्लेऑफमध्ये आपले स्थान कसे निश्चित करेल, समीकरणांबद्दल जाणून घेऊया.
IPL 2024 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आतापर्यंत १३ सामने खेळले आहेत. त्यापैकी ६ सामने जिंकले आहेत तर ७ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. पहिल्या ८ सामन्यातच हे ७ पराभव संघाच्या पदरी पडले, त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला प्लेऑफमध्ये जाणे कठीण झाले होते. यानंतर आरसीबीने सलग ५ सामने जिंकून शानदार पुनरागमन केले आहे. संघ सध्या १२ गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे आणि त्यांचा केवळ एक सामना बाकी आहे.
१८ धावा किंवा १८.१ षटके ठरवणार आरसीबी प्लेऑफ गाठणार की नाही
आरसीबीला प्राथमिक फेरीतील शेवटचा सामना चेन्नई संघाविरुद्ध खेळायचा आहे. आरसीबीला हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकावा लागेल, जेणेकरून संघ १४ गुणांवर पोहोचेल. CSK चे देखील १४ गुण आहेत आणि आरसीबीविरूद्धचा फक्त १ सामना बाकी आहे. आरसीबीला प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी फक्त चेन्नईचा पराभव करून चालणार नाही तर यासाठी संघाला गणितीय समीकरण पाहावे लागणार आहे. CSK संघ सध्या नेट रन रेटमध्ये आरसीबीपेक्षा पुढे आहे. त्यामुळे सीएसकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी केली तर त्यांना किमान १८ धावांनी चेन्नईवर विजय मिळवावा लागेल. जर आरसीबीने प्रथम गोलंदाजी केली, तर त्यांना जे काही लक्ष्य मिळेल ते त्यांना १८.१ षटकांतच गाठावे लागेल.
हेही वाचा- ‘काय हिरो, गार्डनमध्ये आला आहे का?’ तिलक वर्माचं उत्तर ऐकून रोहित शर्माच झाला चकित, VIDEO व्हायरल
दुसरीकडे, लखनऊ-दिल्लीच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने विजय मिळवल्याने राजस्थान रॉयल्सचा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरला. तर गुजरात टायटन्स वि सनरायझर्स हैदराबादचा सामना पावसामुळे रद्द झाला. यामुळे दोन्ही संघांना एक गुण मिळाल्याने हैदराबादचा संघ १५ गुणांसह प्लेऑफमध्ये पोहोचला. आता प्लेऑफमध्ये चौथ्या क्रमांकासाठी कोणता संघ पात्र ठरणार यावर सर्वांच्या नजरा आहेत. यासोबतच चेन्नईने जर आरसीबीविरूद्धचा सामना जिंकला तर त्यांना प्लेऑफमधील दुसरे स्थान गाठण्याचीही संधी आहे. राजस्थानचा संघ सध्या दुसऱ्या स्थानी आहे. त्यांनी सलग ४ सामने गमावले आहेत त्याचसोबत त्यांचा अखेरचा सामनाही जर त्यांनी गमावला तर गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी घसरतील आणि विजय मिळवलेला चेन्नईचा संघ सर्वाधिक गुणांसह दुसऱ्या स्थानी जाईल.