मुल्लानपूर : सलग पराभवानंतर गुणतालिकेत घसरण झालेले पंजाब किंग्ज व गुजरात टायटन्स हे संघ इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमध्ये रविवारी एकमेकांसमोर येतील, तेव्हा त्यांचा प्रयत्न विजयी पुनरागमन करण्याचा राहील.
गुजरातला गेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून पराभूत व्हावे लागल्याने त्यांची आठव्या स्थानी घसरण झाली. गेल्या चार सामन्यांतील हा त्यांचा तिसरा पराभव ठरला. दुसरीकडे पंजाब किंग्जचा संघ नवव्या स्थानी आहे. गेल्या सामन्यात त्यांना मुंबई इंडियन्सकडून नऊ धावांनी पराभूत व्हावे लागले. त्यामुळे या सामन्यात दोन्ही संघांना विजय मिळवायचा झाल्यास आपला खेळ उंचवावा लागेल.
आशुतोष, शशांककडे लक्ष
गेल्या सामन्यात पंजाबला विजयासाठी १९३ धावांची गरज असताना त्यांची अवस्था ४ बाद १४ अशी बिकट झाली. यानंतर आशुतोष शर्मा व शशांक सिंहने संघाला पुनरागमन करून दिले. त्यामुळे या सामन्यातही त्यांच्याकडे लक्ष असेल. शिखर धवनची कमतरता संघाला जाणवत आहे, मात्र रविवारचा सामना तो खेळेल का, याबाबत साशंकता आहे. त्याच्या अनुपस्थितीत सॅम करनवर संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. प्रभसमरिन सिंग, लिआम लििव्हगस्टोन व रायली रूसो यांच्याकडून संघाला अपेक्षा आहे. या सामन्यातही संघाला शशांक व आशुतोषकडून अपेक्षा असेल.
हेही वाचा >>> मी विश्वचषक खेळण्यास तयार – कार्तिक
रशीद, मिलरकडून अपेक्षा
गुजरातने आतापर्यंत तीन सामने जिंकले असून चार सामने गमावले आहेत. दिल्लीविरुद्धच्या निराशाजनक कामगिरीनंतर त्यांना या सामन्यात नव्याने सुरुवात करावी लागेल. गुजरातकडे कर्णधार शुभमन गिल, साई सुदर्शन, डेव्हिड मिलर व रशीद खानसारखे चांगले खेळाडू आहेत. मात्र, तरीही संघाला चमक दाखवता आलेली नाही.
’ वेळ : सायं. ७.३० वा.
’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी, जिओ सिनेमा.