कोलकाता नाईट रायडर्स विरूध्द सनरायझर्स हैदराबादचा सामना सुरू होण्यापूर्वी त्यांचा यष्टीरक्षक फलंदाज रहमनुल्ला गुरबाज चाहत्यांची मन जिंकली. रहमनुल्लाने कोलकाताच्या संघाला भेटायला आलेल्या चाहत्याला बॅटिंग ग्लोव्हज दिले. तर चाहत्यांशी संवादही साधला. त्याचा हा व्हिडिओ केकेआरने सोशल मिडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमधील त्याच्या वागण्याचे खूप कौतुक होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोलकाताने आयपीएल २०२४ मधील त्यांच्या पहिल्या सामन्यात २०८ धावांचा डोंगर उभारला. २०९ धावांचा पाठलाग करणाऱ्या हैदराबादचा केकेआरने अखेरच्या चेंडूवर ४ धावांनी विजय मिळवला. तत्त्पूर्वी कोलकाताचा संघ सामन्याआधी सराव करत असतानाचा गुरबाजचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. जेव्हा एका तरुण चाहत्याने रहमानुल्ला गुरबाजला त्याचे बॅटिंग ग्लोव्हज देण्यास सांगितले, तेव्हा अफगाणिस्तानच्या खेळाडूने क्षणाचाही विलंब न करता त्याला दिले. यानंतर गुरबाजने त्याच्या चाहत्यांसोबत फोटोही काढले. यावेळी तरुण चाहत्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता.

आयपीएल २०२४ हा रहमानुल्ला गुरबाजचा कोलकाता नाइट रायडर्ससह दुसरा हंगाम असेल. त्याला गेल्या वर्षी स्पर्धेत पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. २०२३ च्या वर्षात उजव्या हाताच्या फलंदाजाने केकेआरसाठी ११ सामन्यांमध्ये २०.६४ च्या सरासरीने आणि १३३.३३ च्या स्ट्राइक रेटने २२७ धावा केल्या. यंदाच्या पहिल्या सामन्यात त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. त्याच्या जागी फिल सॉल्टला संघात सामील केले होते, ज्याने पहिल्याच सामन्यात आपल्या अर्धशतकाने प्रभावित केले.

गुरबाजचे अनेकदा इतरांना मदत करतानाचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. २०२३ मध्ये अफगाणिस्तान संघासोबत तो भारतात वनडे वर्ल्डकप खेळण्यासाठी आला होता. त्यावेळेस दिवाळीत त्याने अहमदाबादमध्ये फूटपाथवर राहणाऱ्या लोकांना पैसे दिले होते. त्याचा हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2024 rahamanullah gurbaz gifts batting gloves to young fan at eden gardens before kkr vs srh bdg