गुवाहाटी : राजस्थान रॉयल्स संघ विजयपथावर परतण्यासाठी उत्सुक असून ‘आयपीएल’मध्ये आज, रविवारी त्यांचा गुणतालिकेत अग्रस्थानी असलेल्या कोलकाता नाइट रायडर्स संघाशी सामना होणार आहे. गेले सलग चार सामने गमावणाऱ्या राजस्थानचे कामगिरी उंचावत कोलकाताला नमवण्याचे आणि गुणतालिकेत दुसरे स्थान निश्चित करण्याचे लक्ष्य असेल.
हेही वाचा >>> IPL 2024 : हैदराबादसमोर पंजाबचे आव्हान
राजस्थान संघाने १६ गुणांसह ‘प्ले-ऑफ’मध्ये स्थान मिळवले आहे, पण गेल्या चारही सामन्यांत त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. गेल्या दोन सामन्यांत राजस्थानला १५० धावांचा टप्पाही ओलांडता आला नाही. त्यामुळे त्यांना कामगिरीत मोठी सुधारणा करावी लागणार आहे. इंग्लंडचा सलामीवीर जोस बटलर आता मायदेशी परतल्यामुळे यशस्वी जैस्वाल, कर्णधार संजू सॅमसन आणि रियान पराग या फलंदाजांवर अतिरिक्त जबाबदारी असेल. दुसरीकडे, कोलकाताचा संघ १९ गुणांसह गुणतालिकेत अग्रस्थानी आहे.
हेही वाचा >>> RCB vs CSK: रिंकूसमोर खलनायक ठरलेला यश दयाल धोनीला मात्र पडला भारी, पाहा २० व्या षटकातील थरार
गुजरातविरुद्धचा गेला सामना पावसामुळे न झाल्याने त्यांना एक गुण मिळाला. मुंबई इंडियन्सविरुद्ध ११ मे रोजी झालेल्या सामन्यानंतर कोलकाताने कोणताही सामना खेळलेला नाही. त्यामुळे त्यांना आठवडाभर विश्रांती मिळाली आहे. कोलकाताच्या संघाला आता सलामीवीर फिल सॉल्टविनाच खेळावे लागणार आहे. बटलरप्रमाणेच सॉल्टही आता मायदेशी परतला आहे. सॉल्ट आणि सुनील नरेन यांनी मिळून कोलकातासाठी या हंगामात ८९७ धावा केल्या आहेत. त्यामुळे सॉल्टची उणीव कोलकाताला निश्चित जाणवली. त्याच्या जागी रहमनुल्ला गुरबाझला संधी मिळू शकते. त्याने या हंगामात एकही सामना खेळलेला नाही. तसेच मधल्या फळीत श्रेयस अय्यर, रिंकू सिंह आणि आंद्रे रसेल यांच्यावर संघाची मदार असेल. या सामन्यात पावसाचा व्यत्यय येण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.