लखनौ संघाचा फिरकीपटू रवी बिश्नोईने आपल्या आश्चर्यचकित करणाऱ्या क्षेत्ररक्षणाने सर्वांनाच प्रभावित केले. गुजरातविरूद्धच्या सामन्यात केन विलियमसनला टाकलेल्या चेंडूचा बिश्नोईने स्वत: हवेत झेप घेत कॅच पकडला, खेळाडूंपासून ते दिग्गज क्रिकेटपटूंपर्यंत सर्वच हे पाहून हैराण होते. समालोचकांनीही बिश्नोईच्या या झेलचे खूप कौतुक केले, इतकेच नव्हे तर हा अनपेक्षित झेल यंदाच्या हंगामातील सर्वात्कृष्ट झेलही ठरू शकतो. लखनौच्या गोलंदाजांनी आणि संपूर्ण संघाने गुजरातविरूद्धच्या सामन्यात शानदार कामगिरी करत अवघ्या १६४ धावांचा बचाव करत ३३ धावांनी विजय मिळवला.
लखनौने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनौ सुपर जायंट्सने प्रथम फलंदाजी करत ५ विकेट्स गमावत १६३ धावा केल्या. याच्या प्रत्युत्तरात गुजरात टायटन्सने चांगली सुरुवात केली. सलामीवीर शुभमन गिल-साई सुदर्शन यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. मात्र, पॉवरप्लेच्या शेवटच्या चेंडूवर कर्णधार शुभमन गिल बाद झाला.
गिल बाद झाल्यानंतर किवी संघाचा स्टार आणि अनुभवी फलंदाज केन विल्यमसन फलंदाजीला आला. पण विल्यमसन जास्त वेळ मैदानात टिकू शकला नाही. रवी बिश्नोई विलियमसनला गोलंदाजी करत होता. बिश्नोईच्या ८व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर केन विल्यमसन स्ट्राइकवर होता. पण दुसऱ्या चेंडूवर विल्यमसनने एक विचित्र शॉट खेळला. विलियमसन चेंडू सरळ रेषेत मारण्याचा प्रयत्न केला, हे पाहताच समोर उभ्या असलेल्या बिश्नोईने चित्त्याच्या चपळाईने हवेत झेप घेत चेंडू टिपला.
चेंडू बिश्नोईपासून बऱ्यापैकी दूर होता. पण तरीही त्याने एक अनपेक्षित असा झेल टिपण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वीही झाला. या कॅचसह केन केवळ १ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याच्या झेलचा व्हिडिओही व्हायरल होत आहे. यासह बिश्नोईने २ षटकांमध्ये ८ धावा देत एक महत्त्वाची विकेट संघाला मिळवून दिली.