IPL 2024 Mumbai Indians Captain: आयपीएल २०२४ मधील सर्वाधिक चर्चेचा विषय म्हणजे मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद. मुंबई संघाने त्यांचा नियमित कर्णधार रोहित शर्माच्या हार्दिक पंड्याकडे संघाची जबाबदारी सोपवली. यामुळे सध्या मुंबई संघाला आणि पंड्याला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. यावर माजी खेळाडू रवी शास्त्री यांनी वक्तव्य केले आहे. हार्दिक पंड्याला कर्णधारपदी नियुक्त करताना मुंबई इंडियन्सने संवादात स्पष्टता दाखवली असती, तर पंड्याबद्दल चाहत्यांची तीव्र प्रतिक्रिया टाळता आली असती, असे मत भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले. शास्त्रींनी हार्दिकला शांत राहून त्याच्या कामगिरीने प्रत्युत्तर देण्याचा सल्लाही दिला.

रवी शास्त्री म्हणाले,’हा काही भारतीय संघ खेळत नाहीय, हे फ्रँचायझी क्रिकेट आहे. त्यांनी मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला आहे. ते या संघाचे मालक आहेत आणि कर्णधाराची नियुक्ती करणे हा त्यांचा अधिकार आहे. माझ्या मते, मुंबई संघाने संवादात स्पष्टता ठेवली असती तर हे प्रकरण अधिक चांगल्या प्रकारे हाताळता आले असते.’

शास्त्री पुढे म्हणाले, ‘जर तुम्हाला हार्दिक पांड्याला कर्णधार बनवायचे होते तर तुम्ही असे म्हणायला हवे होते की, आम्ही भविष्याचा विचार करता हा निर्णय घेत आहोत. रोहित शर्माने कर्णधार म्हणून उत्कृष्ट भूमिका साकारली आहे आणि हे आपल्या सर्वांना माहीत आहे. संघाला यशस्वीपणे पुढे नेण्यासाठी रोहितने पुढील तीन वर्षे हार्दिकला मदत करावी अशी आमची इच्छा आहे.’

हार्दिकच्या नेतृत्त्वाखालील संघाला अजून एकही विजय मिळवता आला नाही. शास्त्री म्हणाले, ‘हार्दिकला माझा सल्ला असेल की शांत राहा, धीर धर, सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष कर आणि फक्त तुझ्या खेळावर लक्ष केंद्रित कर. मुंबई इंडियन्सचा संघ उत्कृष्ट असून त्यांना लय मिळाल्यास ते सलग तीन-चार सामने जिंकू शकतील आणि त्यानंतर ही चर्चा आपोआप बंद होईल.’ मुंबई इंडियन्सचा पुढील सामना वानखेडे स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ७ एप्रिलला होणार आहे.

Story img Loader