Virat Kohli And Shikhar Dhawan Jai Veeru Moment Video : सध्या देशात आयपीएलची क्रेझ पाहायला मिळत आहे. अनेक क्रिकेटप्रेमी आयपीएलचा मनसोक्त आनंद लुटताना दिसत आहेत. यात जस जसे सामने पुढे सरकतायत तस तसा चाहत्यांमधील उत्साहदेखील अधिक वाढतोय. अनेक जण स्टेडियममध्ये जाऊन आपला आवडता संघ जिंकण्यासाठी प्रोत्साहन देताना दिसतायत. यात सोशल मीडियावरही आयपीएलसंदर्भात अनेक व्हिडीओ व्हायरल होतायत. यातच आयपीएलमधील पंजाब किंग्सचा कॅप्टन शिखर धवन आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा खेळाडू विराट कोहलीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय. यात विराट कोहली आणि शिखर धवन एका स्कुटीवर बसून रस्त्यावर फिरत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे?
आयपीएल सामन्यांदरम्यान भारतीय स्टार खेळाडूंप्रमाणे हुबेहूब दिसणाऱ्या अनेक व्यक्तींचे व्हिडीओ समोर आले आहेत. खेळाडूंप्रमाणे दिसणाऱ्या या व्यक्तींनी स्टेडियममध्ये हजेरी लावून त्यांच्या चाहत्यांबरोबर अनेक सेल्फीदेखील काढल्या. यात सोशल मीडियावरही खेळाडूंप्रमाणे दिसणाऱ्या डुप्लिकेट्स व्यक्तींविषयी चर्चा रंगली आहे. अनेकदा त्यांना ओळखणेदेखील कठीण होते. अशातच आता भारताचे स्टार खेळाडू विराट कोहली आणि शिखर धवनप्रमाणे हुबेहूब दिसणाऱ्या व्यक्तींचा व्हिडीओ व्हायरल होतोय. हे दोघे स्कुटीवर बसून रस्त्यावरून फेरफटका मारताना दिसतायत.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, विराट कोहली आणि शिखर धवनप्रमाणे दिसणाऱ्या व्यक्ती स्कुटीवर बसून ट्रॅफिक जाममधून रस्त्यावरून वाट काढत आहेत. यावेळी ड्रायव्हिंग सीटवर विराट कोहलीचा डुप्लिकेट आणि त्याच्या मागे शिखर धवनचा डुप्लिकेट बसलेला दिसतोय. दरम्यान, शिखर धवनचा डुप्लिकेट मागच्या सीटवर बसून व्हिडीओ रेकॉर्डिंग करतोय. यावेळी आजूबाजूचे लोक हसताना दिसतायत. या व्हिडीओने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
विराट कोहली आणि शिखर धवन सध्या आयपीएल २०२४ मध्ये अनुक्रमे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्जकडून खेळत आहेत. विराट कोहली यंदाच्या सिझनमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. किंग कोहलीने आत्तापर्यंत खेळलेल्या ८ सामन्यात ६३.१७ च्या सरासरीने ३७९ धावा केल्या आहेत. यामुळे आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो अव्वल आहे.
यात शिखर धवन सध्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. त्याच्या जागी सॅम करन पंजाब किंग्जची जबाबदारी सांभाळण्यास देण्यात आली आहे. पण, पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी हा सीझन काही खास ठरला नाही. ८ पैकी ७ सामने गमावून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू १० व्या स्थानावर आहे, तर पंजाब ८ पैकी ६ सामने गमावून ९ व्या स्थानी आहे. यामुळे हे दोन्ही संघ आता स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहेत.