आयपीएल २०२४ मधील ६८वा सामना आरसीबी विरूद्ध सीएसके यांच्यात खेळवला जाणार आहे. आयपीएलमधील प्राथमिक फेरीतील हा अखेरचा सामना असणार आहे, यानंतर प्लेऑफचे सामने सुरू होणार आहेत. प्लेऑफच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा सामना असणार आहे. चेन्नई-बंगळुरूचा सामना आरसीबीच्या घरच्या मैदानावर म्हणजेच एम चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे. पण या सामन्यादिवशी बंगळुरूमध्ये पाऊस पडणार असल्याची बातमी समोर आली आहे. पावसामुळे हा सामना रद्द झाल्यास कोणता संघ प्लेऑफसाठी पात्र होणार, जाणून घ्या.
सध्या प्लेऑफची शर्यत फार अटीतटीची सुरू आहे. प्रत्येत सामना संघांसाठी महत्त्वाचा असणार आहे. गुजरात वि केकेआरचा सामना अहमदाबादमध्ये पावसामुळे रद्द झाल्याने शुबमन गिलचा गुजरात टायटन्सचा संघ प्लेऑफमधून बाहेर पडला. मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्सनंतर गुजरातही प्लेऑफच्या शर्यतीत नसेल. त्यामुळे केकेआरचा संघ सोडता उर्वरित ६ संघांमध्ये ३ जागांसाठी लढत असणार आहे. ज्यामध्ये सीएसके आणि आरसीबीदेखील प्रबळ दावेदार आहेत. पण या सामन्यावरही पावसाचे सावट आहे.
RCB vs CSK सामन्यात पाऊस आणणार व्यत्यय
RCB vs CSK सामन्यात पावसामुळे सामन्यात व्यत्यय येण्याची शक्यता आहे. हवामान खात्यानुसार, १८ मे रोजी चिन्नास्वामी येथे ७२ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत पावसामुळे सामना रद्द झाल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल, त्यामुळे आरसीबीचे १३ गुण होतील आणि सीएसकेचे १५ गुण होतील. तर आयपीएल २०२४ मधील ६४वा सामना, दिल्ली किंवा लखनऊ यापैकी कोणताही संघ जिंकेल, त्यांचे १४ गुण असतील. त्यामुळे आरसीबीचा संघ गुण कमी असल्याने आणि अखेरचा सामना असल्याने प्लेऑफमधून बाहेर पडू शकतो.
हेही वाचा – IPL 2024: हार्दिकला येताना पाहताच रोहित-सूर्या-तिलक उठून गेले? मुंबई इंडियन्स संघातील वाद पुन्हा चव्हाट्यावर
सध्या, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा नेट रन रेट +०.३८७ आहे, तर CSK चा निव्वळ रन रेट +०.५२८ आहे. जर रॉयल चॅलेंजर्स थोड्या फरकाने सामना जिंकला तर तेही त्यांच्यासाठी फायदेशीर ठरणार नाही. कारण नेट रन रेटच्या बाबतीत तो सनरायझर्स हैदराबाद आणि सुपर किंग्जच्या मागे टाकू शकणार आहे. आरसीबीला जर प्लेऑफमध्ये जायचे असेल तर त्यांना चेन्नईवर १८ धावांनी विजय मिळवावा लागेल किंवा १८.१ षटकांत सामना जिंकावा लागेल. आरसीबीने खराब सुरूवातीनंतर आयपीएलच्या अखेरच्या टप्प्यात चांगली कामगिरी करत सलग सहा सामने जिंकले आहेत. ज्यांचा फायदा संघाला प्लेऑफच्या शर्यतीत कायम राखण्यासाठी झाला आहे. पण संघाचे दोन मोठे खेळाडू टी-२० विश्वचषकासाठी इंग्लंडला परतले आहेत. विस्फोटक फलंदाज विल जॅक्स आणि गोलंदाज रीस टोपली आगामी वर्ल्डकपसाठी मायदेशी परतले आहेत.