दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने जोरदार पुनरागमन करत कोलकाताविरूद्धच्या सामन्यात विस्फोटक फलंदाजी केली. संघाला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला असला तरी, त्याने २५ चेंडूत ४ चौकार आणि ५ षटकारांसह ५५ धावा केल्या. मात्र २७३ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना पंतच्या नेतृत्त्वाखालील संघाला १०६ धावांच्या मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले. सामना संपल्यानंतर कर्णधार ऋषभ पंतला आणखी एक धक्का बसला.
कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात स्लो ओव्हर रेटसाठी दिल्ली कॅपिटल्सला दंड ठोठावण्यात आला आहे. केकेआर विरुद्धचा सामना मोठ्या फरकाने हरल्यानंतर पंतला मोठा फटका बसला आहे. स्लो ओव्हर रेटसाठी आयपीएलने डीसीला दंड ठोठावला. या मोसमात दिल्लीला दुसऱ्यांदा हा दंड ठोठोवण्यात आला आहे. त्यामुळे कर्णधार ऋषभ पंतवर २४ लाखांचा दंड आकारला आहे.
आयपीएल आचारसंहितेचे वारंवार उल्लंघन केल्याबद्दल दिल्ली कॅपिटल्सचे उर्वरित खेळाडू म्हणजेच प्लेईंग इलेव्हन आणि इम्पॅक्ट खेळाडूंनाही दंड ठोठावला आहे. प्रत्येक खेळाडूला ६ लाख रुपये किंवा मॅच फीच्या २५ टक्के दंड भरावा लागेल.
आयपीएलने एका निवेदनात म्हटले आहे की, “दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत आणि त्याच्या संघाला टाटा इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२४ मधील डॉ. वाय एस राजशेखर रेड्डी क्रिकेट स्टेडियम, विशाखापट्टणम येथे ३ एप्रिलला झालेल्या कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात स्लो ओव्हर रेटमुळे दंड आकारण्यात आला आहे.”
“आयपीएलच्या आचारसंहितेनुसार हा स्लो ओव्हर रेट नियमाचे हंगामात सलग दुसऱ्यांदा उल्लंघन केल्याने पंतला २४ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. इम्पॅक्ट खेळाडूंसह प्लेइंग इलेव्हनच्या उर्वरित सदस्यांना वैयक्तिकरित्या ६ लाख रुपये किंवा त्यांच्या संबंधित मॅच फीच्या २५ टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.”