मुंबई इंडियन्स विरूद्ध चेन्नईच्या सामन्यात रोहित शर्माने एकट्याने मुंबईचा डाव उचलून धरला. सलामीसाठी फलंदाजीला उतरलेल्या रोहितने ६३ चेंडूत ५ षटकार आणि ११ चौकारांच्या मदतीने १०५ धावांची शानदार खेळी केली. पण तो संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरल्याची खंत स्पष्ट दिसत होती. रोहित शर्माने १२ वर्षांनंतर आयपीएलमध्ये शतक झळकावले, पण या शतकाचा आनंदही त्याने साजरा केला नाही. चेन्नईच्या विजयानंतर सर्व खेळाडू एकमेकांना हात मिळवत भेटत होते, त्याचवेळेच्या रोहितचा एक व्हीडिओ व्हायरल झाला आहे.
मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा रविवारी चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध शतक झळकावल्यानंतर निराश होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. मुंबई इंडियन्सचा डाव संपल्यानंतरचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये शतकवीर रोहित शर्मा मान झुकवून पॅव्हेलियनच्या दिशेने परतत असल्याचे दाखवण्यात आले आहे. त्याने सामना संपताच धोनीसह काही खेळाडूला हात मिळवत पॅव्हेलियनकडे निघाला. त्याचा हा व्हीडिओ सध्या व्हायरल होत असून इमोशनल करणारा असल्याचेही चाहते म्हणत आहेत.
सहा सामन्यांतील मुंबई इंडियन्सचा हा चौथा पराभव आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स आयपीएल २०२४ च्या गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे. तर चेन्नई सुपर किंग्ज संघ सहा सामन्यांत चार विजयांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. रोहितच्या शतकी खेळीने अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्यांमध्ये रोहित सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. रोहितने याबाबतीत सुरेश रैनाला मागे टाकले आहे.
सलामीवीर म्हणून रोहित मुंबईसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. रोहितने सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे. सचिनने सलामीवीर म्हणून मुंबईसाठी २४९२ धावा केल्या होत्या. रोहित शर्माने आपल्या शतकी खेळीत ५ षटकार ठोकले. यासोबतच रोहितने टी-२० क्रिकेटमध्ये ५०० षटकारही पूर्ण केले आहेत. टी-२० क्रिकेटमध्ये ५०० षटकारांचा आकडा गाठणारा हिटमॅन पहिला भारतीय फलंदाज बनला आहे.