मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर संघाच्या सराव सत्रादरम्यान मुंबईचा माजी भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि त्याचा उत्तराधिकारी हार्दिक पंड्या एकमेकांना मिठी मारताना दिसले. रोहितला पाहताच हार्दिक त्याला मिठी मारण्यासाठी पुढे गेला. त्यानंतर हे दोघे एकमेकांशी बोलताना दिसले. आयपीएलपूर्वी मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ वानखेडे स्टेडियमवर सराव करतानाचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

– quiz

अनेक चाहत्यांनी यावर कमेंट करत पुन्हा एकदा मुंबई इंडियन्स आणि हार्दिक पांड्याला ट्रोल केलं आहे. हार्दिकने रोहितला जबरदस्ती गळाभेट दिली, इतका वेळ रोहितला पाहिलंच नव्हतं का, अचानक रोहित कसा दिसला?, हार्दिक रोहितला मिठी मारण्याचे नाटक करत आहे, अशा बऱ्याच कमेंट्स या व्हिडिओखाली आहेत. मुंबई इंडियन्सच्या अ‍ॅडमिनने काही कमेंट्स डिलीट केल्या असल्याचेही चाहत्यांनी म्हटले आहे.

२०१५ ते २०२१ या काळात मुंबई इंडियन्स संघाचा भाग असलेला हार्दिक पांड्याला गुजरात टायटन्स संघाने आपल्या संघात सामील करून घेतले. गुजरात पहिल्याच सीझनमध्ये जेतेपद मिळवून दिले आणि २०२४ च्या आयपीएलसाठी मुंबई संघात हार्दिक पांड्याचे पुनरागमन झाल्याची घोषणा केली.
डिसेंबरमध्ये इंडियन एक्सप्रेसने वृत्त दिले होते की भारतीय अष्टपैलू खेळाडूचे पुनरागमन हे त्याला मुंबई संघाचा कर्णधार बनवण्याच्या अटीवर होते. रोहितला विश्वचषकाच्या सुरुवातीच्या आसपास फ्रँचायझीचा रोडमॅप समजवून सांगण्यात आला. अनेक बैठकींमध्ये त्याला कर्णधार बदलण्याची आवश्यकता असल्याची माहिती देण्यात आली आणि आगामी हंगामात पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळण्याच्या योजनेशी सहमती दर्शवली.

आगामी आयपीएल हंगामापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना पांड्याने भारतीय कर्णधारासोबतच्या त्याच्या नात्यात कोणताही ताण नसल्याचे स्पष्ट केले होते. “कोणताही गोंधळ नाहीय. तो (रोहित) अजूनही भारताचा कर्णधार आहे. या संघाने त्याच्या नेतृत्त्वाखाली सारं काही साध्य केलं आहे. मी फक्त ते पुढे नेत आहे. मुंबई इंडियन्स संघाकडून मी जेवढं क्रिकेट खेळलो आहे तेवढं रोहितच्या नेतृत्त्वाखाली खेळलो आहे. त्यामुळे मला खात्री आहे की तो मला मदत करण्यासाठी नेहमी सोबत असेल,” तो म्हणाला होता.

मुंबईचा नवीन कर्णधार आणि मुख्य प्रशिक्षक मार्क बाउचर यांनी पांड्याला ट्रेड करतानाच्या कराराबद्दल विचारलेल्या प्रश्नांवर मौन बाळगले, ज्यामुळे ते पुन्हा एकदा चाहत्यांच्या रडारवर आले. कर्णधारपद मिळाल्यानंतर अनेकांनी हार्दिकला ट्रोल केले, यावर पांड्याने उत्तर दिले.

“ज्या गोष्टींवर माझे नियंत्रण नाही, त्यावर मी लक्ष केंद्रित करत नाही. त्याचबरोबर मी चाहत्यांचा खूप आभारी आहे. ते जे बोलतात ते बोलण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे आणि मी त्यांच्या मताचा आदर करतो. आम्ही चांगली कामगिरी करण्यावर लक्ष केंद्रित करू,” असे उत्तर पांड्याने दिले.

मुंबई इंडियन्स आयपीएल २०२४ मधील आपल्या मोहिमेची सुरूवात गुजरात टायटन्सविरूध्दच्या सामन्याने करणार आहे. हा सामना रविवारी २४ मार्चला नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2024 rohit sharma and hardik pandya hugged each other video of mumbai indians went viral bdg