बंगळूरु : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु व गुजरात टायटन्स संघाला ‘प्ले-ऑफ’ मध्ये पोहोचण्याचे आव्हान कायम ठेवायचे झाल्यास शनिवारी होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट सामन्यात विजय मिळवणे अनिवार्य आहे.
बंगळूरुचा संघ सहा गुणांसह गुणतालिकेत सर्वात तळाशी आहे. तर, गुजरातचा संघ दहा सामन्यांनंतर आठ गुणांसह आठव्या स्थानी आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स (दोन्ही संघ १० गुण) हे संघ गेल्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर बंगळूरु व गुजरात यांच्या ‘प्ले-ऑफ’मध्ये पोहोचण्याच्या आशा अजूनही संपुष्टात आलेल्या नाहीत. इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागणार असल्याची कल्पना ही दोन्ही संघांना असल्याने त्यांचा प्रयत्न या लढतीत कामगिरी उंचावण्याचा असेल.
डयूप्लेसिस, जॅक्सकडे लक्ष
बंगळूरुसाठी विराट कोहली हा चांगल्या लयीत आहे. या सत्रात त्याने ५०० धावांचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे या सामन्यात त्याच्याकडून याच कामगिरीची अपेक्षा राहील. संघाला विजय मिळवायचा झाल्यास फॅफ डयूप्लेसिसला आपली कामगिरी उंचवावी लागेल. गेल्या सामन्यात विल जॅक्सने आपल्या शतकी खेळीने सर्वांचे लक्ष वेधले होते. या सामन्यातही त्याच्याकडे लक्ष असेल. दिनेश कार्तिक व रजत पाटीदार यांच्यावरदेखील संघासाठी धावा करण्याची जबाबदारी असेल. बंगळूरुच्या गोलंदाजांनी निराशा केली आहे. मोहम्मद सिराज, यश दयाल, कर्ण शर्मा आणि स्वप्निल सिंह यांना प्रभावित करता आलेले नाही.
हेही वाचा >>> IPL 2024: “आता बोलण्यासारखं माझ्याकडे फार काही नाही…” मुंबईच्या लाजिरवाण्या पराभवानंतर कर्णधार पंड्या नेमकं काय म्हणाला?
साई सुदर्शन, रशीदवर मदार
शुभमन गिल व बी साई सुदर्शन यांनी मिळून गुजरातसाठी ७००हून अधिक धावा केल्या आहेत. वृद्धिमान साहा, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, विजय शंकर व शाहरूख खान यांना फलंदाजीत चमक दाखवता आली नाही. गोलंदाजीत फिरकीपटू रशीद खानसह कोणालाही चमकदार कामगिरी करता आलेली नाही. रशीदला दहा सामन्यांत केवळ आठ गडी बाद करता आले आहेत. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची कमतरता संघाला जाणवत आहे. त्याच्या जागी संघाच्या वेगवान गोलंदाजीची जबाबदारी उमेश यादव व मोहित शर्मा यांच्यावर होती. मात्र, त्यांच्या पदरीही निराशा पडली. गुजरातने संदीप वॉरियसचा पर्यायही वापरून पाहिला. मात्र, त्याचा फायदा झाला नाही. त्यामुळे बंगळूरुविरुद्ध विजय मिळवायचा झाल्यास त्यांच्या गोलंदाजांना कामगिरी उंचवावी लागेल.
’ वेळ : सायं. ७.३० वा. ’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी, जिओ सिनेमा अॅप.