बंगळूरु : आपल्या कामगिरीत सातत्य राखण्यास अपयशी ठरलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचा सामना मंगळवारी लखनऊ सुपर जायंट्स संघाशी होणार आहे. या वेळी बंगळूरुचा प्रयत्न आपली कामगिरी उंचावण्याचा राहील. बंगळूरुचा संघ तीन सामन्यांनंतर दोन गुणांसह गुणतालिकेत आठव्या स्थानी आहे. गेल्या सामन्यात त्यांना कोलकाता नाइट रायडर्सकडून त्यांना मोठया फरकाने पराभूत व्हावे लागल्याने त्यांच्या निव्वळ धावगतीवर त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे संघाला लखनऊविरुद्ध कामगिरी उंचावण्याची आवश्यकता आहे.
घरच्या मैदानावर सामना असल्याने सामना होत असल्यानेन बंगळूरुला चांगली संधी आहे. दुसरीकडे, लखनऊ संघ दोन सामन्यांमध्ये एका विजयासह सहाव्या स्थानी आहे. बंगळूरुविरुद्ध विजय मिळवल्यास त्यांना गुणतालिकेत बढती मिळू शकते. मात्र, त्याकरिता संघाला एकत्रितपणे कामगिरी उंचावणे अपेक्षित आहे.
हेही वाचा >>> MI vs RR : राजस्थानने सलग तिसरा विजय मिळवत गुणतालिकेत पटकावले अव्वल स्थान, मुंबईला ६ विकेट्सनी नमवले
पूरन, डीकॉककडून अपेक्षा
लखनऊचा कर्णधार केएल राहुलच्या तंदुरुस्तीबाबत चिंता कायम आहे. त्यामुळे संघ त्याचा उपयोग ‘प्रभावी खेळाडू’च्या रूपाने करीत आहे. त्याच्या अनुपस्थितीत निकोलस पूरन संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सांभाळत आहेत. त्यामुळे या सामन्यात राहुल कर्णधाराची भूमिका सांभाळतो का, याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे. राहुलच्या स्थितीमुळे पूरन व क्विंटन डीकॉक यांच्यावर धावा करण्यासाठी अधिक दबाव असेल. त्यांना देवदत्त पडिक्कल व मार्कस स्टोइनिस यांची साथ अपेक्षित आहे. गेल्या सामन्यात लखनऊच्या मयांक यादवने आपल्या गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधले. त्यामुळे चिन्नास्वामी स्टेडियमवरही त्याच्याकडून या कामगिरीची अपेक्षा असेल. गेल्या सामन्यात रवि बिश्नोईने निराशा केली, मात्र या सामन्यात त्याला कामगिरी उंचवावी लागेल.
बंगळूरुची मदार फलंदाजांवर
फॅफ डय़ुप्लेसिसच्या नेतृत्वाखालील बंगळूरुच्या संघाला कमी लेखून चालणार नाही. मात्र, त्यांच्या खेळाडूंना कामगिरी सातत्यता राखणे गरजेचे आहे. बंगळूरुकडून विराट कोहलीशिवाय इतर फलंदाजांना चमक दाखवता आलेली नाही. बंगळूरुला चांगली कामगिरी करायची झाल्यास डय़ुप्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार व कॅमेरून ग्रीन यांना योगदान द्यावे लागेल. आघाडीच्या फलंदाजांना योगदान न देता आल्याने दिनेश कार्तिक, अनुज रावत व महिपाल लोमरोर यांच्यावर संघाला अवलंबून रहावे लागत आहे. पाटीदारची खराब लय कायम आहे. त्यामुळे त्याच्या जागी संघ युवा खेळाडूंना संधी देऊ शकते. गोलंदाजांचे योगदानही संघासाठी चिंतेचा विषय ठरत आहे.
’ वेळ : सायं. ७.३० वा.
’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी, जिओ सिनेमा.