रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा आरसीबी अनबॉक्स कार्यक्रमात महिला संघाला पुरुष संघाकडून गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. स्मृती मानधनाच्या नेतृत्त्वाखालील संघाने WPL 2024 च्या अंतिम फेरीत दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करून फ्रँचायझीची पहिली ट्रॉफी जिंकली. आयपीएल २०२४ च्या आधी एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबी अनबॉक्स इव्हेंटमध्ये, विराट कोहली आणि सहकाऱ्यांनी महिला संघाचे त्यांच्या या आगळ्या वेगळ्या कृतीतून कौतुक केले.
– quiz
आरसीबी महिला संघाची कर्णधार स्मृती मानधना विजयी ट्रॉफी आणि तिच्या महिला संघासोबत मैदानात आली. तेव्हा दोन्ही बाजूला आरसीबीच्या पुरूष संघाचे खेळाडू उभे होते आणि त्यांनी टाळ्या वाजवत या चॅम्पियन महिला संघाला शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी महिला संघाने ‘WPL CHAMPIONS 2024’ असे लिहिलेली काळ्या रंगाची जर्सी घातली होती, ज्यावर आरसीबीचा लोगोदेखील आहे. गार्ड ऑफ ऑनरसह मैदानात आलेल्या महिला संघाने संपूर्ण मैदानात फेरी मारत चाहत्यांचेही आभार मानले.
महिला प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सचा आठ गडी राखून पराभव करून विजेतेपद पटकावले. दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना १८.३ षटकात ११३ धावा केल्या. आरसीबीने १९.३ षटकांत दोन गडी गमावून लक्ष्य सहज गाठले.
या कार्यक्रमापूर्वी स्मृतीची विराटसोबत तुलना केली जात होती. त्या प्रश्नावर तिने चोख उत्तर दिले आहे. ती म्हणाली, मी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे स्पर्धेचे टायटल जिंकणे ही वेगळी गोष्ट आहे. पण माझ्याव्यतिरिक्त १९ क्रमांकाची जर्सी घातलेल्या त्या खेळाडूने (विराट कोहली) त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत जे मिळवले आहे, ते खूप मोठं आहे. त्यामुळे माझं करियर आणि त्याने जे काही साध्य केलं आहे या जोरावर विराटशी माझी तुलना करणं हे अजिबातचं योग्य नाही.