Ruturaj Gaikwad and MS Dhoni: कोलकातावर चेन्नईनं इतक्या आरामात विजय मिळवला जणू हा डावाचा पराभव वाटावा. आयपीएलचा हा हंगाम सुरू झाल्यापासून प्रथमच ऋतुराज गायकवाडच्या फलंदाजीला बहर आलेला बघायला मिळाला. नाबाद राहत चेन्नईला विजय मिळवून देताना ऋतुराजनं या मैदानावरील आपली सर्वोच्च धावसंख्याही नोंदवली. कोलकातावर चेन्नईनं सहज विजय मिळवला पण लक्षात राहण्यासारखी बाब म्हणजे धोनी व ऋतुराज दोघांनीही एकमेकांना दिलेला मान.
– quiz
सामन्यात तीन षटके शिल्लक असताना चेन्नईला जिंकण्यासाठी अवघ्या ३ धावा हव्या होत्या. झंझावाती खेळी केलेला शिवम दुबे बाद झाला नी साक्षात धोनी मैदानावर आला. जणू काही तो चेन्नईच्या आपल्या चाहत्यांना खूश करण्यासाठी आला असावा. ऋतुराजने ५८ धावांत ६७ धावांची खेळी केली होती. पण त्याने जणू काही धोनीचा मान ठेवत, ३ धावा जिंकायला हव्या असताना १ धाव काढून धोनीला स्ट्राईक दिला. उगवत्या कर्णधारानं मावळत्या कर्णधाराला दिलेली ही मानवंदना होती. पण मावळता कर्णधारही इतक्या उमद्या मनाचा की त्याने १ धाव काढून पुन्हा ऋतुराजलाच खेळायला दिलं, जणू काही सत्तेचं प्रतीकात्मक हस्तांतरणच! यानंतर मात्र ते स्वीकारत ऋतुराजनं थेट चौकार मारत सत्ताग्रहण व सामनाविजय दोन्ही साजरा केला.
एक कर्णधार जाऊन दुसरा येताना काय काय दुर्दैवी घटना वा चर्चा घडू शकतात याचा एक अनुभव ताजा असतानाच, धोनी व ऋतुराज दोघांनी एकमेकांना दिलेला मान व सत्तेचं हस्तांतरण स्पृहनीयच म्हणावं लागेल.
ऋतुराजने ६७ धावांच्या संयमी खेळीसह हंगामातील पहिले अर्धशतक झळकावले. या सामन्यानंतर बोलताना ऋतुराजने एक जुनी आठवण सांगितली. कर्णधार म्हणाला, “मला एक जुना प्रसंग आज आठवत आहे. जेव्हा मी आयपीएलमध्ये माझे पहिले अर्धशतक झळकावले होते, तेव्हाही माही भाई माझ्यासोबत होते आणि अशाच स्थितीत असलेला सामना आम्ही जिंकला होता.” यानंतर संघाचे नेतृत्त्व करण्याबद्दल ऋतुराज म्हणाला, “मला या संघात कोणालाही काहीच सांगण्याची गरज भासत नाही. प्रत्येकजण खूप उत्साहात असतात, महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी माही भाई आणि फ्लेमिंग अजूनही आहेत.”
ऋतुराजच्या या अर्धशतकी खेळीसह चेन्नईने केकेआरला नऊ विकेट्सवर १३७ धावांवर रोखले. तर प्रत्युत्तरात १७.४ षटकांत ३ विकेट्स गमावून लक्ष्य गाठले. या विजयासह चेन्नईने यंदाच्या मोसमातील घरच्या मैदानावरील तिन्ही सामने जिंकले आहेत आणि आता गुणतालिकेत सीएसके चौथ्या स्थानावर आहे.