IPL 2024, Mumbai Indians vs Chennai Super Kings: वानखेडेवर खेळल्या गेलेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने मुंबईचा २० धावांनी दणदणीत पराभव करत आयपीएलमधील चौथा विजय नोंदवला. ऋतुराजच्या नेतृत्त्वाखालील संघाने उत्कृष्ट कामगिरी करत मुंबईसारख्या बलाढ्य संघाचा त्यांच्या घरच्या मैदानावर पराभव केला. या सामन्यात कर्णधार ऋतुराजने ४० चेंडूत ५ षटकार ५ चौकारांच्या मदतीने ६९ धावांची दमदार खेळी केली. या खेळीसह ऋतुराजने आयपीएलमध्ये २ हजार धावा पूर्ण करत मोठा विक्रम आपल्या नावे केला.
ऋतुराज गायकवाडने मुंबई इंडियन्सविरुद्ध अर्धशतक झळकावून या विक्रमाला गवसणी घातली. डावाचा विचार करता गायकवाड आयपीएलच्या इतिहासात सर्वात जलद २ हजार धावा करणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. या बाबतीत ख्रिस गेल आघाडीवर आहे. गायकवाडने मुंबईविरुद्ध ३३ चेंडूत अर्धशतक झळकावले. १७२ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना ४८ धावा पूर्ण करताच गायकवाडने २ हजार धावांचा टप्पा गाठला.
आयपीएलमधील सर्व खेळाडूंच्या यादीत गायकवाड तिसऱ्या स्थानी आहे. ख्रिस गेल आणि शॉन मार्श हे अनुक्रमे पहिल्या दुसऱ्या स्थानी आहेत. गेलने ४८ डावांत ही कामगिरी केली होती, तर शॉन मार्शने ५२ डावांत ही कामगिरी केली होती. तर गायकवाडने ५७ डावात हा पराक्रम केला आहे. गायकवाडनंतर केएल राहुलचे नाव भारतीय खेळाडूंमध्ये आहे. त्याने आयपीएलमध्ये ६० डावात २ हजार धावा पूर्ण केल्या होत्या.
सर्वात जलद २ हजार धावा पूर्ण करणारे भारतीय फलंदाज
ऋतुराज गायकवाड – ५७ डाव
केएल राहुल – ६० डाव
सचिन तेंडुलकर – ६३ डाव
ऋषभ पंत – ६४ डाव
गौतम गंभीर – ६८ डाव