सलग तीन पराभवांनंतर विजयी पथावर परतलेल्या मुंबई इंडियन्सला त्यांच्या घरच्या मैदानावर चेन्नईकडून पराभव पत्करावा लागला. चेन्नईने शानदार कामगिरीच्या जोरावर मुंबईचा २० धावांनी पराभव केला. रोहित शर्माने चेन्नईविरूद्धच्या या सामन्यात तब्बल १२ वर्षांनंतर आयपीएलमध्ये शचतक झळकावले, पण तरीही तो संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. सलामीला उतरलेला रोहित शेवटपर्यंत नाबाद राहिला, पण इतर फलंदाजांची साथ न मिळाल्याने मुंबईच्या हातून हा विजय निसटला. पथिरानाने या सामन्यात झटपट ४ विकेट्स घेत चेन्नईच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. पण याशिवाय कोणती दोन षटके सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरली. जाणून घ्या.
– quiz
चेन्नईच्या विजयाचा हिरो आणि सामनावीर ठरलेला मथीशा पथिरानाने ४ विकेट्स मिळवले. मुंबईने सामन्याला दणक्यात सुरूवात केली आणि पॉवरप्लेमध्ये ६३ धावा केल्या. आठवे षटका पथिरानाला मिळताच त्याने पहिल्या चेंडूवर इशान किशनला आणि तिसऱ्या चेंडूवर सूर्यकुमार यादवला शून्यावर बाद केले. इथून चेन्नईने सामन्यात पुनरागमन केले. पण सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरला १५ वे आणि १६वे षटक.
मुंबईला शेवटच्या ६ षटकात विजयासाठी ७७ धावांची गरज होती. संघाच्या ७ विकेट्स शिल्लक होत्या आणि हे लक्ष्य गाठण्याजोगे होते. पण चेन्नईने सलग दोन षटकात केवळ ५ धावा दिल्या आणि एक विकेटही घेतली, जिथे सामना पूर्णपणे चेन्नईच्या बाजूने फिरला.
चेन्नई सुपर किंग्जकडून शार्दुल ठाकूरने १५वे षटक टाकले. त्याने वाइड लाइनवर सतत हल्ला केला आणि त्यामुळे रोहित शर्माला पहिल्या तीन चेंडूंवर एकच धाव करता आली. त्यानंतर हार्दिक पांड्यालाही पुढच्या तीन चेंडूंवर एकच धाव करता आली. १६वे षटक मुंबईकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या तुषार देशपांडेने टाकले. या षटकात त्याने फक्त दोन धावा दिल्या आणि हार्दिक पांड्याची महत्त्वाची विकेटही मिळवली. या दोन षटकांनंतर मुंबईला २४ चेंडूत ७२ धावांची गरज होती, जे अत्यंत कठीण होते. रोहितची अखेरच्या चेंडूपर्यंत फटकेबाजी सुरू होती, पण या षटकांमधील बरेचसे चेंडू डॉट गेल्याने त्याचा फटका बसला.