IPL 2024, Gujarat Titans vs Punjab Kings: गुजरात टायटन्सवर पंजाब किंग्जने मिळवलेल्या विजयानंतर सगळीकडे शशांक सिंग आणि आशुतोष शर्मा यांनी संघाला शानदार विजय मिळवून दिल्या. २०० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबने झटपट विकेट्स गमावल्या. त्यामुळे गुजरात संघाने सामन्यावर आपली पकड अधिक घट्ट् केली होती. मात्र, शशांक आणि आशुतोषने गुजरातच्या विजयाच्या आशांवर पाणी फेरले आणि त्यांच्याकडून विजय हिसकावून घेत संघाला शानदार विजय मिळवून दिला.
शशांक आणि आशुतोषने सातव्या विकेटसाठी अवघ्या २२ चेंडूत ४३ धावांची भागीदारी करून संघाला सामन्यात कायम ठेवले. शशांक सिंग तर संघाला विजय मिळवून दिल्यानंतरच माघारी परतला. त्याने २९ चेंडूत ६१ धावांची वादळी खेळी केली. तर आपला पहिलाच आयपीएल सामना खेळणाऱ्या आणि इम्पॅक्ट खेळाडू म्हणून मैदानावर आलेल्या आशुतोष शर्माने १७ चेंडूत दमदरा ३१ धावांची खेळी केली.
आयपीएलने या सामन्यानंतर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये शशांक सिंग आणि आशुतोष शर्माने लक्ष्याचा पाठलाग करताना काय विचार करत होते आणि एकमेकांशी काय संवाद साधत होते याबद्दल सांगितलं.
“धावगतीचं आव्हान वाढत असतानाही आम्ही दोघांनी परिस्थितीचं दडपण घेतलं नाही. आम्ही दोघे जोवर मैदानात टिकून आहोत तोपर्यंत संघाला विजय मिळवून देऊ, असा विश्वास होता. आम्ही एकमेकांशी चर्चा करताना हेही म्हणालो की दोन षटकांत फक्त २४ धावा हव्या आहेत, आपण आरामात हा आकडा गाठू.”
आशुतोष अखेरच्या षटकात पहिल्या चेंडूवर षटकार मारण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. त्यानंतर शशांक मात्र मैदानात कायम होता आणि संघाला विजय मिळवून देत परतला. शशांकनेही सामन्यानंतर आशुतोषच्या खेळीचे कौतुक केले. आशुतोषने शशांकसोबत केलेल्या ४३ धावांच्या भागीदारीमुळे त्याच्यावरील धावा करण्याचा दबाव कमी झाल्याचे तो म्हणाला.
शशांक सिंगला जेव्हा समजलं की तो दुसऱ्या डावात पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करणार तेव्हा तो खूपच उत्साहित झाला होता. ही संधी मिळताच त्याने विचार केला की त्याला त्याच्या शानदार खेळीने अधिक प्रभावी कामगिरी करता येईल आणि प्रत्यक्षातही तेच घडलं.
जेव्हा मला प्रशिक्षक आणि संजय सरांनी सांगितले की आज ५व्या क्रमांकावर फलंदाजी करेन. तेव्हा मी याकडे अधिक चेंडूंचा सामना करण्याची आणि माझ्या खेळीने मोठा प्रभाव पाडण्याची एक उत्तम संधी म्हणून पाहिले. खेळपट्टी चांगली होती आणि एक क्रिकेटपटू म्हणूनआम्ही सर्वच आपल्या संघासाठी सामना जिंकण्याचा प्रयत्न करतो आणि मला वाटले की माझ्या संघासाठी सामना जिंकण्याची ही संधी आज मला मिळाली आहे.”