IPL 2024, Gujarat Titans vs Punjab Kings : पंजाबच्या गुजरातविरूध्द मिळवलेल्या शानदार विजयाचा हिरो ठरला तो म्हणजे अनकॅप्ड खेळाडू शशांक सिंग. जो सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येणाऱ्या या फलंदाजाने २९ चेंडूत ६१ धावांची नाबाद खेळी खेळली. एकेकाळी २०० धावांच्या आव्हानात्मक धावसंख्येसमोर पंजाबचा निम्मा संघ अवघ्या १११ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला होता. पण इथूनच शशांक सिंगने वादळी खेळी करत पंजाब किंग्जला आश्चर्यकारक विजय मिळवून दिला.
शशांक सिंगने पाचव्या विकेटसाठी सिकंदर रझासोबत २२ चेंडूत ४१ धावा, सहाव्या विकेटसाठी जितेंद्र शर्मासोबत १९ चेंडूत ३९ धावा आणि सातव्या विकेटसाठी नवोदित आशुतोष शर्मासोबत २२ चेंडूत ४३ धावांची सामन्याला कलाटणी देणारी भागीदारी रचली. पंजाब किंग्जचा चार सामन्यांमधला हा दुसरा विजय आहे. आरसीबीविरूद्धच्या पहिल्या सामन्यातही शशांक सिंगची खेळी संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची ठरली.
आरसीबीविरूध्दच्या सामन्यात पंजाब किंग्सचा विस्फोटक फलंदाज शशांक सिंगने ८ चेंडूत २१ धावा केल्या. चिन्नास्वामी मैदानात रंगलेल्या सामन्यात पंजाब किंग्जचा संघ सन्मानजनक धावसंख्या गाठण्यासाठी झुंजत होता.पंजाबने १९ षटकांत केवळ १५० धावांचा टप्पा ओलांडला होता. बेंगळुरूच्या खेळपट्टीचे स्वरूप पाहता आरसीबीचे फलंदाज ही धावसंख्या सहज गाठू शकणार होते. मात्र, अखेरच्या षटकात पंजाबने लिलावात चुकून संघात घेतलेल्या शशांकने पंजाबच्या धावांमध्ये भर घातली आणि संघाची धावसंख्या १७६ वर नेली.
शशांक सिंग पंजाबसाठी खूपच प्रभावी खेळाडू ठरला आहे. पण तो पंजाब किंग्सच्या संघात दाखल होण्याचा प्रसंगही तितकाच आगळावेगळा आहे. डिसेंबर २०२३ मध्ये आयपीएल लिलावादरम्यान पंजाबने चुकून शशांकच्या नावावर बोली लावली होती. लिलावासाठी उपलब्ध खेळाडूंच्या पूलमध्ये शशांक सिंग नावाचे दोन खेळाडू होते. एक छत्तीसगढचा ३२ वर्षीय शशांक आणि दुसरा १९ वर्षांचा खेळाडू शशांक सिंग होता. शशांकचे नाव समोर येताच पंजाब संघाची मालकीण प्रीती झिंटाने २० लाख रुपयांच्या मूळ किंमतीवर बोली लावली. इतर संघांनी शशांकसाठी बोली लावण्यात रस दाखवला नाही. त्यामुळे शशांक पंजाबच्या संघात दाखल झाला.
शशांकला संघात सामील करून घेतल्यानंतर पंजाब संघाला जाणवलं की त्यांनी चुकीच्या खेळाडूवर बोली लावली आहे. यामुळे संघाच्या कॅम्पमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आणि त्यांनी लिलावकर्त्यांकडे खेळाडू बदलण्याची मागणी केली. पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. पण नंतर पंजाब किंग्जने स्पष्ट केले की, गेल्यावर्षी सनरायझर्स हैदराबादने रिलीज केल्यानंतर लिलावात अनसोल्ड राहिलेला अनकॅप्ड अष्टपैलू खेळाडू नेहमीच त्यांच्या खेळाडूंच्या यादीत होता आणि त्यामुळे त्याला लिलावात चुकून खरेदी केले नाही.
शशांकने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत एकूण ५६ टी-२० सामने खेळले होते. ज्यामध्ये त्याने पाच अर्धशतके आणि १३५.५८ च्या स्ट्राईक रेटच्या मदतीने ७६१ धावा केल्या. शशांक आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स (दिल्ली कॅपिटल्स), सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्सचा संघाचाही भाग राहिला आहे.