Shivam Dube Wife Anjum Khan Instagram Post for MS Dhoni: एम एस धोनी यंदा आयपीएलमध्ये आपल्या वादळी फलंदाजीने ‘माही मार रहा है’ याची झलक सर्वांना दाखवत आहे. माहीचा चाहता वर्ग किती मोठा आहे, याचा प्रत्यय आपल्याला आय़पीएलच्या प्रत्येक सामन्यात पाहायला मिळते. या चाहत्यांच्या यादीत क्रिकेटपटूंच्या पत्नीही आहेत. सीएसके संघाचा अष्टपैलू खेळाडू शिवम दुबेच्या कुटुंबाने धोनीची भेट घेतली. या भेटीतील धोनीचा शिवम आणि त्याच्या पत्नीसोबतचा फोटो अंजुमने शेअर केला आहे. या पोस्टवरील तिच्या लांबलचक पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

शिवमची पत्नी अंजुम ही धोनीची लहानपणापासूनच मोठी चाहती आहे आणि तिने धोनीची एक मुलाखत पाहिल्यानंतरच भारताचे सामने नित्यनेमाने पाहायला सुरूवात केली. या पोस्टमध्ये भावूक होत तिने भलंमोठं कॅप्शन दिले आहे. अंजुमने कॅप्शनमध्ये म्हटले, “धोनी हे नाव मी एका बातम्यांच्या चॅनलवर ऐकले होते, जेव्हा धोनीला भारतीय संघाचे कर्णधारपद मिळाले होते. याआधीही क्रिकेट पाहायला मला आवडायचं पण इतकंही नाही मी पूर्ण सामना पाहत बसेन. आणि का माहित नाही पण मी त्या चॅनेलवरची माहीची पूर्ण मुलाखत पाहिली. ती एक साधारण मुलाखत नव्हती. एक कनेक्शन, माझ्या भावना त्या मुलाखतीशी जोडल्या गेल्या होता आणि त्यानंतर मग मी क्रिकेट पूर्णपणे पाहायला सुरूवात केली. तेव्हापासून ते आतापर्यंत. जोपर्यंत धोनी भारतीय संघातून खेळत होता तोपर्यंत मी भारताचा प्रत्येक सामना पाहिला.”

धोनी आणि क्रिकेटबद्दल सांगताना पुढे म्हणाली, माझ्यासाठी धोनी म्हणजे क्रिकेट आहे आणि क्रिकेट म्हणजे धोनी. “सॉरी मी ‘सर’ हा शब्द त्यांच्यासाठी नाही वापरत आहे, पण हीच तर त्याची ओळख आणि त्यांना दिला जाणारा मान आहे की लहान मुलांपासून सगळेच त्यांना माही, धोनी या नावाने ओळखतात आणि सीएसकेमुळे थाला. धोनी आमच्या सर्वांच्या मनातला एक हळवा कोपरा आहे. आताही हे लिहिताना मी भावूक झाली आहे.”

हेही वाचा-IPL 2024: पोलार्ड आणि टीम डेव्हिडवर आयपीएलकडून कारवाई, मुंबई-पंजाबमधील लाईव्ह सामन्यातील ‘ही’ चूक पडली महागात

धोनीचा यंदाचा लांब केस असलेल्या लुकबद्दल सांगताना अंजुम म्हणाली, “पण या हंगामात धोनीचे लांब केस पाहून मी भावूक झाली कारण मला असं झालं की वेळ किती पटकन निघून गेला. एका क्षणात माझं बालपण माझ्या डोळ्यासमोरून गेलं. आजही त्यांना पाहिल्यावर माझ्या तोंडातून शब्द निघत नाहीत. आधी टीव्हीवर त्यांचे सामने पाहताना मी जितकी उत्साहित असायची आजही तितकीच उत्साहात आणि आनंदात असते.”

माही आणि त्याची फिनिशरची भूमिका यावर बोलताना अंजुम म्हणाली, “माझ्यासाठी लहानपणी जे माही होते आजही अगदी तसेच आहेत. संपूर्ण टीम बाद झाली तरी माही आहे ना तो जिंकून देईल मॅच, काही नाही होणार आपणचं जिंकणार असा विश्वास अजूनही कायम आहे. जर कधी लवकर आऊटही झाले तरी काही हरकत नाही. होतं असं कधी कधी, पण माही तर माही आहे… “

हेही वाचा-IPL 2024: धोनीचा अद्भुत षटकार! संपूर्ण कारकिर्दीत माहीने पहिल्यांदाच लगावला भन्नाट शॉट; एबी-सूर्यालाही विसराल

चाहती म्हणून अंजुमने तिच्या मनातील भावना या कॅप्शनद्वारे मांडताना म्हणाली, “मी इथे जे बोलतेय ते त्यांना सांगू शकत नाही ना माझ्या भावना त्यांना समजावू शकतं. पण माझ्यासाठी ‘माही है तो मुमकीन है’ असंच आहे. जेव्हा पहिल्यांदा भारताने टी-२० वर्ल्डकप जिंकला आणि नंतर वनडे वर्ल्डकपही जिंकला. मी आजही माहीसाठी तीच लहानपणीची अंजुम आहे. आज मी त्यांना भेटू शकते, यावर माझा विश्वासच बसत नाहीय. पण माहीला भेटण्याच्या आणि त्यांच्यासाठीच्या माझ्या भावना इतक्या तीव्र होत्या की देवानेही ती पूर्ण केली आणि ही इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याने शिवमला निवडल. धन्यवाद शिवम.”

पती शिवम दुबेचे आभार मानत अंजुमने या दोघांना सामन्यात चिअर करण्याबद्दल पुढे लिहिले, “मी सामन्यात शिवमला जेवढं चिअर करते तेवढंच माहीला सुध्दा करते. पण माहीसाठी नक्कीच थोडं जास्त चिअर करते. शिवमलाही माहितीय की धोनी माझ्यासाठी काय आहेत. सर्वांसारखंच मी सुद्धा अजूनही माही स्क्रिनवर दिसले की जोरजोरात चिअर करते.”

माही प्रत्यक्षात नेमका कसा असेल, त्याचा स्वभाव कसा असेल याची अंजुमला भिती होती, त्याबद्दल तिने पोस्टच्या शेवटी म्हटलंय, “लहानपणापासून जो खेळाडू आवडायचा, तो प्रत्यक्षात नेमका कसा व्यक्ती असेल, ती व्यक्ती इतरांपेक्षा वेगळी तर नसेल ना, अशी भिती मनात होती. पण धोनी एक माणून म्हणून किती चांगले आहेत हे त्यांना भेटल्यावर समजलं. माझं तर स्वप्न होतं की शिवमने त्यांच्या संघातून खेळावं आणि त्यांच्याकडून खूप काही शिकावं.”

अंजुमच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्स आणि लाइक्सचा पाऊस पाडला आहे. तर शिवमनेही या पोस्टवर कमेंट केली आहे. यंदा शिवम दुबेही त्याच्या गगनचुंबी षटकारांमुळे चर्चेत आहे. यंदा होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी शिवम दुबेला भारतीय संघात सामील करण्याची मागणी केली जात आहे.