IPL 2024, Gujarat Titans vs Punjab Kings: अहमदाबादच्या घरच्या मैदानावर खेळवल्या जाणाऱ्या पंजाब वि गुजरातच्या सामन्यात शुबमन गिलने शानदार ८९ धावांची खेळी केली. गिलने ४८ चेंडूत ६ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ८९ धावांची खेळी केली. आयपीएल २०२४ मधील ही आतापर्यंतची सर्वात मोठी वैयक्तिक धावसंख्या आहे. या सामन्यात गुजरातचा कर्णधार गिलने या खेळीसह ३००० धावांचा टप्पा गाठला आहे. यासह त्याने भारताच्या इतर दिग्गज फलंदाजांना मागे टाकत एक मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना शुबमन गिल शेवटपर्यंत नाबाद राहिला. ८९ धावांच्या खेळीसह आयपीएलमध्ये सर्वात जलद ३ हजार धावा करणारा गिल हा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. गुजरात टायटन्सचा कर्णधार गिलने आयपीएलच्या ९२व्या डावात ही कामगिरी केली. आयपीएलमध्ये सर्वात जलद ३ हजार धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत केएल राहुल पहिल्या क्रमांकावर आहे. राहुलने अवघ्या ८० डावात आयपीएलमधील ३००० धावा पूर्ण केल्या होत्या.
शुबमन गिलने या यादीत विराट कोहली आणि रोहित शर्माही मागे टाकले आहे. विराट कोहलीने आयपीएलमध्ये ११० डावात ३ हजार धावा पूर्ण केल्या, तर रोहितने १०९ डावांमध्ये ३ हजार धावा पूर्ण केल्या. ११० डावात ही कामगिरी करण्याचा विक्रमही गौतम गंभीरच्या नावावर आहे. तर सुरेश रैनाने १०३ डावात आयपीएलमधील ३ हजार धावा पूर्ण केल्या, तर अजिंक्य रहाणेने १०४ डावात ही कामगिरी आपल्या नावे केली.