IPL 2024, Gujarat Titans vs Delhi Capitals: दिल्ली कॅपिटल्सने आयपीएलच्या इतिहासातील एक जबरदस्त विजय नोंदवला. इशांत शर्मा आणि मुकेश कुमार यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर गुजरात टायटन्सला केवळ ८९ धावांत गुंडाळल्यानंतर, दिल्ली कॅपिटल्सने ९ षटकांत विजय मिळवला. गुजरातच्या या मानहानीकारक पराभवानंतर संघाचा कर्णधार शुबमन गिलने संघाच्या फलंदाजी बाजूला फटकारले.
गिलने जीटीच्या पराभवासाठी खेळपट्टीला दोष देण्यास नकार दिला आणि त्याऐवजी त्याच्या फलंदाजांच्या खराब शॉट निवडीला या पराभवाचे कारण म्हटले. गिलने सामन्यानंतरच्या सादरीकरणात सांगितले की, “संघाच्या फलंदाजांची कामगिरी खूपच साधारण होती. खरं सांगायचं तर मला वाटते की विकेट ठीक होती. आम्ही ज्या पद्धतीने आऊट झालो ते बघितले तर त्याचा खेळपट्टीशी काहीही संबंध नव्हता. माझ्या मते फलंदाजांची शॉटची निवड खराब होती.”
या आयपीएलमध्ये जीटीची फलंदाजी अपयशी होण्याची ही दुसरी वेळ होती. लखनौ सुपर जायंट्ससमोर १६४ धावांचा पाठलाग करताना संघ १३० धावांवर बाद झाला. तो पुढे म्हणाला- “जेव्हा विरोधी संघ ८९ धावांचा पाठलाग करत असतो तेव्हा एखादा गोलंदाज दुहेरी हॅट्ट्रिक घेत नाही तोपर्यंत विरोधी संघ खेळात कायम असतो. सध्या या स्पर्धेतील निम्मे अंतर आम्ही पार केले आहे. आम्ही ३ जिंकले आहेत आणि आशा आहे की गेल्या काही वर्षांप्रमाणे आम्ही पुढील ७ पैकी आणखी ५-६ सामने जिंकू.”
या विजयासह दिल्ली गुणतालिकेत गुजरातला मागे सारत सहाव्या स्थानावर पोहोचली आहे. गुजरात टायटन्सचा संघ १७.३ षटकांत ८९ धावांवर बाद झाला. गुजरात टायटन्सची ही स्पर्धेतील सर्वात कमी धावसंख्या होती. प्रत्युत्तरात डीसीने अवघ्या ८.५ षटकांत सहा गडी गमावून लक्ष्य गाठले.
गुजरातच्या डावात यष्टीमागे दोन झेल आणि दोन स्टंपिंग करण्यासोबतच दिल्लीच्या धावांचा पाठलाग करताना नाबाद १६ धावा करणाऱ्या ऋषभ पंतला सामनावीर घोषित करण्यात आले. त्याच्याशिवाय जॅक-फ्रेझर मॅकगर्कने २०, शाई होपने १९ आणि अभिषेक पोरेलने १५ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. सलामीवीर पृथ्वी शॉ ७ धावा करून लवकर बाद झाला. सुमित कुमारने (९) पंतसोबत पाचव्या विकेटसाठी नाबाद २५ धावांची भागीदारी केली.