हैदराबाद : गेल्या तीन वर्षांत प्रथमच इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) ‘प्ले-ऑफ’मध्ये स्थान मिळवलेला सनरायजर्स हैदराबादचा संघ आज, रविवारी दुपारच्या सत्रात होणाऱ्या सामन्यात पंजाब किंग्जविरुद्ध खेळेल. हा सामना जिंकून गुणतालिकेत दुसरे स्थान मिळवण्याचे हैदराबादचे लक्ष्य असेल. सॅम करन आता मायदेशी परतल्याने या सामन्यात यष्टिरक्षक-फलंदाज जितेश शर्मा पंजाब संघाचे नेतृत्व करणार आहे.
हेही वाचा >>> RCB in Playoffs: यश दयाळ ठरला आरसीबीचा तारणहार: बलाढ्य चेन्नईला नमवत प्लेऑफ्समध्ये
‘आयपीएल’च्या गेल्या तीन हंगामात गुणतालिकेत तळाशी राहिलेल्या हैदराबादने यावर्षी आक्रमक फलंदाजी आणि प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर ‘प्ले-ऑफ’मध्ये स्थान मिळवले. गुजरात टायटन्सविरुद्ध गेला सामना पावसामुळे रद्द झाल्याने हैदराबादने अंतिम चार संघांत आपले स्थान निश्चित केले. हैदराबादचे १३ सामन्यांत १५ गुण असून ते गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहेत. पंजाबला नमवल्यास ते १७ गुणांपर्यंत पोहचू शकतात. मात्र, रविवारचा अन्य सामना कोलकाता आणि राजस्थान यांच्यात होणार आहे. या सामन्यात राजस्थानचा पराभव झाला तरच हैदराबाद संघ दुसऱ्या स्थानावर कायम राहू शकेल.
हैदराबादचे सलामीवीर ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी संपूर्ण हंगामात अप्रतिम फलंदाजी केली. कर्णधार पॅट कमिन्स, अनुभवी भुवनेश्वर कुमार आणि टी. नटराजन यांच्यामुळे हैदराबादची गोलंदाजी मजबूत दिसत आहे.