सूर्यकुमार यादवने एकाच खेळीत आपल्या पुनरागमनाचा डंका वाजवला. सूर्याने यंदाच्या आयपीएलमधील दुसऱ्याच सामन्यात आपल्या नेहमीच्या अंदाजात वादळी फलंदाजी केली. तीन महिन्यांनंतर दुखापतीतून परतल्यानंतर आयपीएल २०२४ च्या पहिल्या सामन्यात सूर्या शून्यावर बाद झाला होता. पण पुढच्याच सामन्यात सूर्यकुमार यादवची जादू वानखेडेवर पाहायला मिळाली. सूर्याने चौकार-षटकारांची आतिषबाजी करत आयपीएल २०२४ मधील दुसरे जलद अर्धशतक झळकावले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

– quiz

सूर्यकुमार यादवने अवघ्या १७ चेंडूत अर्धशतक झळकावले. सनरायझर्सच्या अभिषेक शर्माने १६ चेंडूत अर्धशतक करत यंदाच्या मोसमातील पहिले जलद अर्धशतक केले होते. तर आरसीबीविरूद्ध बाद होण्यापूर्वी सूर्याने १९ चेंडूत ४ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने ५१ धावा केल्या. इशान आणि रोहितच्या फटकेबाजीनंतर मुंबईच्या विजयात सूर्याने मोठी भूमिका बजावली. सूर्याचे या सामन्यात सुपला शॉट पाहायला मिळाले. या शॉट्सबद्दल सांगताना सूर्या सामन्यानंतर नेमकं काय म्हणाला जाणून घ्या.

सूर्या या सामन्यानंतर म्हणाला, “वानखेडेवर येऊन खेळण्याचा आनंद वेगळाच आहे. जेव्हा आयपीएलला सुरूवात झाली तेव्हा मी फक्त शरीराने एनसीएमध्ये होतो पण मनाने मात्र मी संघासोबतच होतो. पुन्हा आल्यावर असं वाटलं की मी कधी इथून कधी गेलोच नव्हतो. जेव्हा आपण २०० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असतो तेव्हा दव हा फॅक्टर लक्षात घेत फटके खेळण्याची जोखीम पत्करावी लागते. रोहित आणि इशानने चांगली सुरूवात करून दिली. रन रेट पाहता आम्हाला लवकरात लवकर सामना संपवायचा होता.”

सूर्या मैदानात फटकेबाजी करत असताना प्रत्येक कोपऱ्यात फटके कसे खेळतो असतो आणि त्याच्या अनोख्या शॉट्सबद्दल सांगताना तो म्हणाला, “मला फील्डशी (जिथे क्षेत्र रक्षक नसेल तिथे फटके खेळून समोरच्या कर्णधाराला क्षेत्ररक्षणात बदल करायला लावणे) खेळायला आवडतं. मी या शॉट्सचा सराव करत असतो आणि मसल मेमरीमुळे हे फटके खेळतो. मग मैदानात जाऊन माझ्या फलंदाजीचा आनंद घेतो.”

सूर्यकुमार यादवच्या पुनरागमनामुळे मुंबई संघाची फलंदाजी बाजू अधिक भक्कम झाली आहे. आरसीबीविरूद्धच्या सामन्यात मुंबईने १५.३ षटकांत विजय मिळवत आपल्या खात्यात २ गुण मिळवले आहेत. मुंबईचा पुढील सामना आता रविवारी १४ एप्रिल चेन्नई सुपर किंग्सविरूद्ध वानखेडेवर होणार आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2024 suryakumar yadav hits fifty in just 17 balls and reveald how he plays diiferent shots in field mi vs rcb bdg