IPL 2024, Punjab Kings vs Mumbai Indians: मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्जच्या सामन्यात मुंबईकडून सूर्यकुमार यादवने एक विस्फोटक फलंदाजी केली. सूर्या फलंदाजी करत असतानाच मैदानात एक प्रसंग घडला, जो आता चर्चेचा विषय ठरला आहे. सूर्या फलंदाजी करत असताना डगआऊटमध्ये बसलेल्या टीम डेव्हिडने त्याला वाइडसाठी रिव्ह्यू घेण्या इशारा केला. डेव्हिड सूर्याला करत असलेला इशारा कॅमेऱ्यात कैद झाला. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सामन्यातील १५व्या षटकात, सूर्यकुमार यादव मैदानात पाय घट्ट रोवून उभा होता. या षटकात सूर्या ४६ चेंडूत ६३ धावा करून खेळत होता. पंजाब किंग्जचा गोलंदाज अर्शदीप सिंगने त्याच्याविरुद्ध ऑफ स्टंपच्या बाहेर गोलंदाजी केली आणि सूर्यकुमार यादवला या चेंडूवर फटका मारता आला नाही. चेंडू वाइड लाईनच्या थोडासा बाहेर होता पण अंपायरने तो वाइड दिला नाही. सूर्यकुमार यादवनेही यासाठी काही अपील केले नाही.
टीम डेव्हिड आणि मार्क बाउचर यांनी डगआउटमधून केला रिव्ह्यूसाठी इशारा
मात्र डगआऊटमध्ये बसलेल्या टीम डेव्हिड आणि मार्क बाउचरने रिप्लेमध्ये चेंडू वाईड असल्याचे पाहिले. त्यानंतर दोघांनाही डगआऊटमधून सूर्यकुमार यादवला त्यावर रिव्ह्यू घेण्याचे संकेत दिले. बाउचर आणि डेव्हिड या दोघांनी हातवारे करत इशारे केले. मात्र, पंजाब किंग्जचा कर्णधार सॅम करनने हे पाहताच याला विरोध केला आणि डगआऊटमधून रिव्ह्यू घेण्याचे संकेत दिले जात असल्याचे पंचांना सांगितले. परंतु असे असतानाही पंचांनी हे प्रकरण तिसऱ्या पंचाकडे सोपवले. रिव्ह्यू घेतल्यानंतर चेंडू वाईड देण्यात आळा आणि त्यामुळे अर्शदीपला अखेरचा चेंडू पुन्हा टाकावा लागला. या चेंडूवर सूर्याने चांगलाच चौकार खेचत संघाची धावसंख्या १३० वर नेली.
टीम डेव्हिड आणि कोच मार्क बाऊचर यांनी डगआऊटमधून इशारा केला खरा पण नियमांनुसार कोणत्याही खेळाडूला असे करण्याची परवानगी नाही. करनने हे प्रकरण निदर्शनास आणून दिले तरीही पंचांनी यावर कोणतीच कारवाई केली नाही, त्यामुळे सोशल मीडियावर चाहत्यांकडून रोष व्यक्त केला जात आहे.
२०१७ मध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. पुणे इथे झालेल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्हन स्मिथला बाद देण्यात आलं. सहकारी पीटर हँड्सकॉम्ब याच्याशी बोलल्यानंतर स्मिथने ड्रेसिंगरुमच्या दिशेने पाहिलं. तिथे रिव्ह्यू घे असा सल्ला देण्यात आला. त्यानंतर स्मिथने रिव्ह्यू घेत असल्याचं पंचांना सांगितलं. स्मिथची ही कृती पाहून भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली भडकला. त्याने पंचांकडे याची तक्रार केली. पंचांनी स्मिथला यासंदर्भात ताकीद देत पुन्हा असं न वागण्याचा सल्ला दिला होता.
आयपीएलमधील ३३वा सामना गुरुवारी मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात खेळला गेला. मुल्लापूर येथे झालेल्या या रोमांचक सामन्यात मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्जचा अखेरच्या षटकात ९ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने २० षटकांत ७ गडी गमावून १९२ धावा केल्या. प्रत्युत्तरात आशुतोष शर्माच्या स्फोटक खेळीनंतरही पंजाब किंग्जचा संघ १९.१ षटकांत १८३ धावांवर सर्वबाद झाला. अशाप्रकारे पंजाबला त्यांच्याच घरच्या मैदानावर पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला आणि मुंबई इंडियन्सला आणखी एक विजय मिळाला.