IPL 2024, Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फलंदाज रजत पाटीदारने मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर तुफान फटकेबाजी करत संघाचा डाव सावरला. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात पाटीदारने स्फोटक खेळी खेळली आणि अवघ्या २५ चेंडूत अर्धशतक केले. त्याने आपल्या खेळीत ३ चौकार आणि ४ षटकार मारले. यातील एक गगनचुंबी षटकार पाहून विराट कोहली आश्चर्यचकित झाला, त्याच्या या प्रतिक्रियेचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.
– quiz
आरसीबीचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरला आणि संघाने तिसऱ्या षटकात विराटची लवकर विकेट गमावली. त्यानंतर पुढच्याच षटकात विल जॅक्स ८ धावा करत बाद झाला. त्यानंतर आलेल्या रजत पाटीदारने फाफ डू प्लेसिससोबत संघाचा डाव सावरला. या खेळीदरम्यान त्याने एकापेक्षा एक चांगले फटके खेळले.
पाटीदारने १०व्या षटकात हा दमदार षटकार मारला. हार्दिक पंड्याने त्याच्या १०व्या षटकाची चांगली सुरूवात केली. पण पाटीदारने संधी मिळताच मोठे फटके खेळले. याच षटकाचा पाचवा चेंडू पाटीदारने ऑफ स्टंपच्या इथून उचलला आणि वाइड लाँग ऑनच्या दिशेने एक जोरदार षटकार मारला. पाटीदारचा हा षटकार इतका नेत्रदीपक होता की चेंडू रॉकेटसारखा हवेत गेला आणि नंतर प्रेक्षकांमध्ये पडला. हा षटकार पाहून विराट कोहलीनेही आश्चर्य व्यक्त केले, हा षटकार पाहताना जागेवर उभा राहिला, पाटीदारचा षटकार पाहून विराट कोहलीचा आ वासला गेला. त्याची प्रतिक्रिया व्हायरल होत आहे.
रजत पाटीदार गेला काही काळ खराब फॉर्मशी झगडत होता. सीएसकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात तो शून्यावर बाद झाला होता. यानंतर त्याने पंजाब किंग्जविरुद्ध १८ धावांची इनिंग खेळली. त्यानंतर केकेआरविरुद्ध त्याचा खराब फॉर्म कायम राहिला आणि तो अवघ्या ३ धावा करून बाद झाला. यानंतर त्याने एलएसजीविरुद्ध २९ धावा केल्या. तर राजस्थान रॉयल्सविरुद्ध त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही. आता त्याने पुन्हा एकदा शानदार पुनरागमन केले आहे.