MI vs CSK El Classico Match IPL 2024: आयपीएलमधील बहुप्रतिक्षित आणि हायव्होल्टेज सामना आज वानखेडेवर पाहायला मिळणार आहे. आयपीएलचे विक्रमी ५ वेळा जेतेपद पटकावणारे चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स असे तगडे सामने आज एकमेकांशी भिडणार आहेत. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. पहिले तीन सामने गमावल्यानंतर नवा कर्णधार हार्दिक पंड्याच्या नेतृत्त्वाखाली मुंबईने नंतरचे दोन सामने जिंकून जोरदार पुनरागमन केले आहे. त्याचप्रमाणे नव्या युवा कर्णधाराच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जही या हंगामात गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहेत. चेन्नई वि मुंबईच्या सामन्याला एल क्लासिको असं म्हटलं जातं, पण त्याचं नेमकं कारण काय आहे, जाणून घ्या.
चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांमध्ये अटीतटीची भिडंत पाहायला मिळते. एल क्लासिको हा एक स्पॅनिश शब्द आहे ज्याचा अर्थ उत्कृष्ट आहे. स्पॅनिश फुटबॉल क्लब एफसी बार्सिलोना आणि रिअल मॅड्रिड एफसी यांच्यातील सामने फारच चुरशीचे होतात. हा शब्द त्या दोन्ही संघांमधील चुरस आणि द्वंद्व दर्शवतो. या दोन्ही संघांच्या लढतीला एल क्लासिको असे म्हटले जाते. संघांचा चाहता वर्ग ही मोठ्या प्रमाणात आहे. त्याचप्रमाणे मुंबई चेन्नई सामन्यातील चुरस असते आणि म्हणून आयपीएलमधील या सामन्याला एल क्लासिको म्हणतात.
आयपीएलच्या १७व्या मोसमात चेन्नईने आतापर्यंत ५ पैकी ३ सामने जिंकले आहेत. तर मुंबई इंडियन्सने ५ पैकी २ सामने जिंकण्यात यश मिळवले आहे. आणि संघ सातव्या स्थानावर आहे. आयपीएलमधील या दोन्ही संघांचा इतिहास पाहता दोन्ही संघ आतापर्यंत ३८वेळा आमनेसामने आले आहेत. यापैकी मुंबई इंडियन्सने २१ वेळा तर चेन्नई सुपर किंग्सने १७वेळा विजय मिळवला आहे.
चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात यंदा एकदाच सामना खेळवला जात आहे. आयपीएलमधील संघांचे दोन गट केले आहेत. या दोन्ही गटांमध्ये ५-५ संघ आहेत. ज्यामुळे एका गटातील संघ एकमेकांशी एकदाच भिडणार आहेत, तर दुसऱ्या गटातील संघांशी त्यांचे दोन सामने आहेत. चेन्नई आणि मुंबईचा संघ एकाच गटात असल्याने ही एल क्लासिको लढत एकदाच पाहायला मिळणार आहे.
चेन्नई सुपर किंग्सचे कर्णधारपद यंदा धोनीने ऋतुराज गायकवाडच्या खांद्यावर सोपवले आहे. ४२ वर्षीय धोनी यंदाचे हे अखेरचे वर्ष आयपीएल खेळणार आहे, अशी चर्चा आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्स वि चेन्नईचा हा सामना धोनीचा वानखेडेवरील अखेरचा सामना असू शकतो. यंदाच्या लीगमध्ये पुन्हा मुंबई वि सीएसके भिडणार नसल्याने धोनी वानखेडेवर अखेरचा सामना खेळण्याची शक्यता आहे.