IPL 2024, Delhi Capitals vs Kolkata Knight Riders: केकेआरचा अष्टपैलू खेळाडू सुनील नरेनने वादळी फलंदाजी करत संघाच्या विजयाचा पाया रचला. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध त्याने २१ चेंडूत अर्धशतक केले आणि बाद होण्यापूर्वी त्याने ३९ चेंडूत ८५ धावा केल्या. यादरम्यान, चौथ्या षटकात अनुभवी गोलंदाज इशांत शर्माच्या षटकात त्याने तीन षटकार आणि दोन चौकारांसह २६ धावा केल्या. सुनील नरेनने पहिल्या दोन चेंडूंवर सलग दोन षटकार आणि तिसऱ्या चेंडूवर एक चौकार लगावला. पण याच षटकातील चौथ्या चेंडूवर नरेन बाद झाला असता पण ऋषभ पंतने रिव्ह्यू घेण्यास उशीर केल्यामुळे दिल्लीने ही संधी गमावली.
पहिल्या तीन चेंडूंमध्ये १६ धावा दिल्यानंतर, इशांत शर्माने चौथा शॉर्ट चेंडू टाकला, ज्यावर सुनील नरेनला पुल शॉट मारायचा होता. चेंडू बॅटजवळून कीपरच्या ग्लोव्हजमध्ये गेला.मसुरुवातीला याकडे कोणीही लक्ष दिले नाही. पण याचदरम्यान क्षेत्ररक्षकाने झेलबाद झाल्याचं अपील केले तेव्हा कर्णधार ऋषभ पंत थोडा गोंधळलेला दिसला आणि बराच वेळानंतर त्याने रिव्ह्यू घेण्याचे संकेत दिले, परंतु पंचांनी नकार दिला कारण डीआरएस घेण्याची वेळ संपली होती. डीआरएस घेण्यासाठी फक्त १५ सेकंदांचा वेळ असतो, त्याआधी कर्णधाराने रिव्ह्यूसाठी संकेत द्यावा लागतो. पण पंतने उशीर केल्याने त्यांनी रिव्ह्यू घेता आला नाही.
कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या या सामन्यात असे दोन प्रसंग आले जेव्हा दिल्ली कॅपिटल्सला रिव्ह्यू घेऊन विकेट घेण्याची संधी मिळाली. पण एकदा रिव्ह्यू घेण्यास उशीर झाला आणि दुसऱ्यांदा ऋषभ पंतने डीआरएस घेण्यास नकार दिला. सामना संपल्यानंतर ऋषभ पंतने रिव्ह्यू न घेणे यावर मत व्यक्त केले.
चौथ्या षटकात इशांत शर्माच्या चेंडूने सुनील नरेनच्या बॅटची कड घेतली आणि चेंडू थेट पंतच्या ग्लोव्हजमध्ये गेला. पंतला आधी रिव्ह्यू घ्यायचा नव्हता आणि नंतर इशारा करताच रिव्ह्यू घेण्याची वेळ संपली होती. श्रेयस अय्यरविरुद्धही त्याने रिव्ह्यू घेतला नाही. यावर मॅचनंतर पंत म्हणाला- “मैदानात खूप आवाज होता आणि स्क्रीनवर टायमरही दिसत नव्हता, कदाचित स्क्रीनमध्येही काहीतरी प्रॉब्लेम होता. काही गोष्टी आपल्या नियंत्रणात असतात आणि काही नसतात.”