Abhishek Nayar Enters in IPL 2025: भारतीय क्रिकेट संघाच्या कोचिंग स्टाफमधील असिस्टंट कोच अभिषेक नायरला बीसीसीआयने राम राम ठोकला आहे. नवे मुख्य कोच गौतम गंभीर यांच्या कोचिंग स्टाफमधील असिस्टंट कोच अभिषेक नायरला पदावरून बाजूला केल्याची माहिती रिपोर्टमध्ये काही दिवसांपूर्वीच समोर आली होती. पण ही फक्त अफवा नसून खरंच अभिषेक नायरला पदावरून हटवल्याचे चित्र दिसत आहे. कारण आता आयपीएल २०२५ च्या मध्यातच संघाशी जोडला गेला आहे.

भारतीय संघातील नोकरीवरून काढून टाकल्यानंतर, प्रसिद्ध प्रशिक्षक अभिषेक नायर यांना नवीन नोकरी मिळाली आहे. टीम इंडियाच्या सहाय्यक प्रशिक्षकपदावरून अलिकडेच काढून टाकण्यात आलेला अभिषेक नायर पुन्हा एकदा आयपीएलमध्ये परतला आहे.

अभिषेक नायर गतविजेता संघ कोलकाता नाईट रायडर्समध्ये परतला आहे. कोलकाता संघाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याची माहिती शनिवारी १९ एप्रिल रोजी दिली. टीम इंडियाच्या खराब कामगिरीनंतर बीसीसीआयने अलीकडेच नायरला संघातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता. मुंबईचा माजी अष्टपैलू खेळाडू अभिषेक नायर गेल्या हंगामापर्यंत कोलकाता नाईट रायडर्सचा भाग होता. तो अनेक हंगामांपासून या फ्रँचायझीमध्ये सहाय्यक प्रशिक्षक म्हणूनही काम करत होता.

आता एका वर्षापेक्षा कमी कालावधीत, नायर पुन्हा केकेआरमध्ये परतला आहे. नायरचे पुनरागमन अशा वेळी झाले आहे जेव्हा कोलकाता या हंगामात संघर्ष करत आहे आणि आतापर्यंत त्यांनी ७ पैकी फक्त ३ सामने जिंकले आहेत. नायरच्या पुनरागमनामुळे संघातील खेळाडूंना मदत होईल, अशी अपेक्षा आहे.

२०२४ मध्ये जेतेपद जिंकणाऱ्या कोलकाताच्या कोचिंग स्टाफचा अभिषेक नायर भाग होता. त्यानंतर संघ आयपीएल चॅम्पियन झाल्यानंतर, मेन्टॉर गौतम गंभीरला टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आले. त्याच्यासोबत नायरलाही सहाय्यक प्रशिक्षक म्हणून टीम इंडियामध्ये समाविष्ट करण्यात आले. पण १० महिन्यांपेक्षा कमी कालावधीत अभिषेक नायरला कोचिंग स्टाफमधून वगळण्यात आले. जानेवारीमध्ये झालेल्या बीसीसीआयच्या आढावा बैठकीनंतर नायरला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

गेल्या वर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान टीम इंडियाला कसोटी मालिकेत दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. यादरम्यान संघातील अनेक अंतर्गत बातम्याही माध्यमांमध्ये आल्या, ज्यामुळे बराच गोंधळ उडाला. याचबरोबर कोचिंग स्टाफमधील एक महत्त्वाचा सदस्यही त्याच्यावर नाराज असल्याचे सांगण्यात आले आहे. या सर्व मुद्द्यांवर आढावा बैठकीत चर्चा झाली, त्यानंतर एप्रिल महिन्यातच नायरला टीम इंडियामधून वगळल्याची बातमी आली. आतापर्यंत, बीसीसीआय किंवा नायर यांनी या प्रकरणात काहीच अधिकृत माहिती दिली नव्हती, परंतु आता कोलकाता संघात परतल्यानंतर सर्व काही स्पष्ट झालं आहे.