IPL Auction 2025 Day 1 Highlights: IPL 2025 च्या मेगा लिलावाच्या पहिल्या दिवशी, फ्रँचायझींनी खेळाडूंवर जोरदार बोली लावली आणि पाण्यासारखा पैसा खर्च केला आहे. दहापैकी पाच संघांना कर्णधार हवा आहे. यासाठी संघांनी मागे-पुढे न पाहता बँक तोडली आणि खेळाडूंना संघात सामील केलं. ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर हे आयपीएल लिलावातील अनुक्रमे सर्वात महागडा आणि दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरले.
ऋषभ पंत सर्वात महागडा खेळाडू
लखनौ सुपर जायंट्सकडून ऋषभ पंतसाठी चकित करणारी बोली पाहायला मिळाली. लखनौने त्यांचा कर्णधार केएल राहुलला लिलावापूर्वी रिलीज केले होते आणि जेव्हा त्यांना लिलावात संधी मिळाली तेव्हा त्यांनी दिल्लीचा माजी कर्णधार ऋषभ पंतला विकत घेण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. पंतसाठी मोठी बोली लागली पण एलएसजीने शेवटपर्यंत हार मानली नाही आणि २७ कोटी रुपयांना या विकेटकीपर-फलंदाजला विकत घेण्यात यश मिळविले. अशाप्रकारे ऋषभ पंत आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. एलएसजीने पंतसाठी लिलावात ज्या प्रकारे पैसे खर्च केले, त्यावरून तो पुढील हंगामात संघाचे नेतृत्व करताना दिसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
लखनौ सुपर जायंट्स : ऋषभ पंत, निकोलस पूरन, मयंक यादव, रवी बिश्नोई, आवेश खान, डेव्हिड मिलर, अब्दुल समद, आयुष बडोनी, मोहसिन खान, मिचेल मार्श, एडन मारक्रम
श्रेयस अय्यर- लिलावातील दुसरा महागडा खेळाडू
पंजाब किंग्जने श्रेयस अय्यरला २६.७५ कोटी रुपयांमध्ये सामील केले. गेल्या मोसमात केकेआरला चॅम्पियन बनवूनही अय्यरला त्याच्या संघाने कायम ठेवलं नाही. इतकंच नव्हे तर त्याला पुन्हा एकदा संघात सामील करून घेण्यासाठी संघाने मोठी बोली लावली नाही. जेव्हा अय्यरच्या नावाचा लिलावात उल्लेख झाला तेव्हा पंजाबने अय्यरला त्यांच्या संघात समाविष्ट करण्यासाठी २६ कोटींहून अधिक रुपये खर्च केले. अय्यरचे उत्कृष्ट नेतृत्त्व पाहून पंजाब त्याच्याकडे नक्कीच संघाचे कर्णधारपद सोपवणार आहे.
पंजाब किंग्स : श्रेयस अय्यर, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल, मार्कस स्टॉइनिस, शशांक सिंग, ग्लेन मॅक्सवेल, प्रभसिमरन सिंग, हरप्रीत ब्रार.
हेही वाचा – IPL Auction 2025: १२ खेळाडूंवर संघांनी खर्च केले १८०.५० कोटी; शमी, सिराज, राहुलवर किती लागली बोली?
व्यंकटेश अय्यरला लागली लॉटरी
कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) अष्टपैलू व्यंकटेश अय्यरला विकत घेण्यासाठी मोठी बोली लावली. त्याला संघाने २३.७५ कोटी रुपयांना आपल्या संघात सहभागी केले. कोलकाताने श्रेयस अय्यरलाही इतकी बोली न लावता व्यंकटेश अय्यरला इतक्या मोठ्या किमतीत खरेदी केलं हे पाहून पुढील वर्षी व्यंकटेश अय्यर त्यांच्या संघाची कमान सांभाळणार आहे, असे चित्र दिसत आहे. त्याच्याच संघाने व्यंकटेशसाठी मोठी बोली लावली हे पाहून त्याला आनंद झाला. अष्टपैलू व्यंकटेश अय्यरने रविवारी सांगितले की तो संघाने कर्णधारपद दिले तर ते आव्हान आनंदाने स्वीकारेल. KKR ने लिलावापूर्वी २०२४ चा आयपीएल विजेता कर्णधार श्रेयस अय्यरला कायम न ठेवण्याचा निर्णय घेतला होता. यामुळेच व्यंकटेश अय्यरला विकत घेण्यासाठी संघाने लिलावात मोठी रक्कम खर्च केली.
कोलकाता नाईट रायडर्स : व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, वरुण चक्रवर्ती, आंद्रे रसेल, सुनील नरेन, एनरिक नोर्किया, हर्षित राणा, रमणदीप सिंग, क्विंटन डी कॉक, अंगक्रिश रघुवंशी, रहमानउल्ला गुरबाज.
केएल राहुलच्या किमतीत घट
कोलकाताप्रमाणेच दिल्ली कॅपिटल्सनेही लिलावाच्या पहिल्याच दिवशी आपला कर्णधार निश्चित करत त्याच्यावर शेवटपर्यंत बोली लावली. दिल्लीने केएल राहुलला १४ कोटी रुपयांना विकत घेतले. केएलला यावेळी ३ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, कारण तो गेल्या हंगामापर्यंत लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार असताना त्याला १७ कोटींना संघात सामील केले होते. केएलला खरेदी केल्याने, केएल हा दिल्लीचा पुढचा कर्णधार असणार हे स्पष्ट झाले.
दिल्ली कॅपिटल्स: अक्षर पटेल, केएल राहुल, कुलदीप यादव, मिचेल स्टार्क, ट्रिस्टन स्टब्स, जेक फ्रेझर मॅकगर्क, हॅरी ब्रूक, अभिषेक पोरेल, समीर रिझवी, करुण नायर.