IPL 2025 Dates Announced : आयपीएल २०२५ साठी २४ आणि २५ नोव्हेंबर रोजी महालिलाव सौदी अरेबियातील जेद्दाह शहरात होणार आहे. या महालिलावात एकूण ५७४ खेळाडूंचा लिलाव होणार आहे. दरम्यान, बीसीसीआयने पुढील तीन हंगामांसाठी काही महत्त्वाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. आयपीएलचे हे मोठे पाऊल आहे. असे यापूर्वी कधीच घडले नव्हते. आयपीएलसाठी जाहीर झालेल्या तारखांनुसार, आयपीएल २०२५ चा हंगाम १४ मार्चपासून सुरू होईल आणि अंतिम सामना २५ मे रोजी होईल. याबाबत बीसीसीआयने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही
तसेच आयपीएल २०२६ चा हंगाम १५ मार्च ते ३१ मे दरम्यान खेळवला जाईल, तर २०२७ चा हंगाम १४ मार्च ते ३० मे दरम्यान खेळवला जाणार आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या अहवालानुसार, गुरुवारी फ्रँचायझींना पाठवलेल्या ईमेलमध्ये, आयपीएलने स्पर्धेच्या तारखांची विंडो दिली आहे. ही अंतिम तारीख असण्याची शक्यता आहे. आयपीएल २०२५ मध्ये एकूण ७४ सामने खेळवले जाणार आहेत. गेल्या तीन हंगामात इतकेच सामने खेळले गेले आहेत. जेव्हा बीसीसीआयने आपले मीडिया राइट्स विकले, तेव्हा प्रत्येक हंगामात ८४ सामने खेळले जाण्याची चर्चा होती, परंतु अद्याप तसे झालेले नाही.
आयपीएल २०२५ च्या महालिलावाकडे सर्वांचे लक्ष –
जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग आयपीएलची चाहते नेहमीच आतुरतेने वाट पाहत असतात. आयपीएलने जगभरातील क्रिकेटपटूंना एक उत्तम व्यासपीठ दिले आहे. येथे खेळणाऱ्या खेळाडूंना पैसा आणि प्रसिद्धी दोन्ही मिळते. आयपीएल रिटेन्शन पार पडल्यानंतर आता चाहत्यांच्या नजरा मेगा ऑक्शनवर खिळल्या आहेत. या लिलावात अनेक फ्रँचायझी आपल्या संघांची पूर्णपणे नव्याने बांधणी करतील. अशात अनेक महागडे खेळाडूही खरेदी केले जातील, अशी अपेक्षा आहे.
हेही वाचा – IPL 2025 : १० पैकी ५ संघांकडे नाही कर्णधार; बटलर, पंत आणि अय्यरसह ‘या’ खेळाडूंवर लागू शकते मोठी बोली
u
यावेळी, आयपीएल २०२५ च्या महालिलावात ५७४ खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे. या ५७४ खेळाडूंपैकी ४८ कॅप्ड भारतीय खेळाडू, १९३ कॅप्ड परदेशी खेळाडू, ३ असोसिएट नॅशनल खेळाडू, ३१८ अनकॅप्ड भारतीय खेळाडू आणि १२ अनकॅप्ड परदेशी खेळाडूंचा महालिलावात समावेश आहे. या खेळाडूंपैकी केवळ २०४ खेळाडूंना खरेदी करता येणार आहे. ज्यामध्ये ७० स्लॉट विदेशी खेळाडूंसाठी आहेत.