IPL 2025 CSK Player Falls Asleep in Match Photo: चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल २०२५ मध्ये सलग तीन सामने गमावत पराभवाची हॅटट्रिक साधली आहे. दिल्ली कॅपिटल्सने सीएसकेचा त्यांच्या घरच्या मैदानावर २५ धावांनी पराभव केला आहे. चेन्नईची संपूर्ण फलंदाजी फळी या सामन्यात अपयशी ठरली. विजय शंकर आणि धोनीची जोडी शेवटपर्यंत फलंदाजी करत होती. पण या दोघांची फलंदाजी जणू कसोटी सामन्यातील खेळीसमान होती. या खेळीदरम्यान मैदानावर वेगळंच चित्र पाहायला मिळालं.
दिल्लीने चेपॉकच्या मैदानावर चेन्नईचा १५ वर्षांनी पराभव केला. चेन्नईच्या फलंदाजी फळीने नाराज तर केलंच. पण फिनिशर धोनी आणि विजय शंकर ज्या पद्धतीने फलंदाजी करत होते, ते पाहून चाहते तर नाराज झालेच पण चेन्नईचा खेळाडूही झोपलेला दिसला.
चेन्नईच्या ऐतिहासिक चेपॉक स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात यजमान संघाची फलंदाजी अतिशय निरुत्साही ठरली. दिल्लीने दिलेल्या १८४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना संघाची सुरुवात खराब झाली आणि संघाने सातत्याने विकेट गमावल्या. मोठे लक्ष्य गाठण्यासाठी वेगवान फलंदाजीची गरज होती. पण संघाची फलंदाजी फळी दिल्लीच्या उत्कृष्ट गोलंदाजीसमोर अपयशी ठरली.
दिल्लीची गोलंदाजी जेव्हा चेन्नईवर दबाव निर्माण करत तेव्हा चेन्नईचे फलंदाज प्रत्येक धावासाठी मोठे कष्ट घेताना दिसत होते. चेन्नईची अशी फलंदाजी पाहून चाहतेही वैतागले होते. चेन्नईचा युवा खेळाडू वंश बेदी संघाच्या फलंदाजीला इतका कंटाळला आणि मध्येच झोपला. सामन्यादरम्यान कॅमेरा चेन्नईच्या डगआऊटकडे गेला तेव्हा रवींद्र जडेजाच्या शेजारी बसलेला वंश बेदी झोपलेला दिसला. काही सेकंदांनंतर कॅमेरा तिथून दूर गेला पण वंशचा हा फोटो अल्पावधीतच सोशल मीडियावर व्हायरल झाला.
वंशचा झोपलेला फोटो पाहून या सामन्यातील चेन्नईची फलंदाजी अवस्थाही स्पष्ट केली. दिल्लीने दिलेले १८४ धावांचे लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न करताना चेन्नईने ११व्या षटकापर्यंत केवळ ७४ धावांत ५ विकेट गमावल्या होत्या. लवकर फलंदाजीला आलेल्या एमएस धोनीलाही संघाच्या फलंदाजीला वळण देता आली नाही. घऱच्या मैदानावर फलंदाजी करताना सीएसकेची अवस्था पाहून संघाला चाहत्यांनी ट्रोल केलं आहे.
धोनी आणि विजय शंकर यांनी संपूर्ण २०व्या षटकापर्यंत फलंदाजी केली आणि ८४ धावांची भागीदारी केली. परंतु ८४ धावा या दोघांनी ७ धावांमध्ये केल्या. दोघांची फलंदाजी इतकी सुस्त होती की त्यांना ११व्या ते २०व्या षटकात केवळ ६ चौकारच ठोकता आले.