IPL 2025, KKR VS CSK Highlights: कोलकाता नाईट रायडर्सने चेन्नईचा बालेकिल्ला असलेल्या चेपॉकच्या मैदानावर दणदणीत विजय मिळवला. कोलकाताने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. चेन्नईच्या फलंदाजांना घरच्या मैदानावर लौकिकाला साजेसं खेळता आलं नाही आणि त्यांनी केवळ १०३ धावांची मजल मारली. कोलकाताच्या सर्वच गोलंदाजांनी शिस्तबद्ध मारा केला. हे मामुली लक्ष्य ८ विकेट्स राखून पार करत कोलकाताने अद्भुत वर्चस्वासह विजय साकारला.
IPL 2025 Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders Highlights: चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामन्याचे लाईव्ह अपडेट्स
कोलकाताचा दणदणीत विजय
कोलकाता नाईट रायडर्स संघाने चेन्नईचा बालेकिल्ला असलेल्या चेपॉक मैदानावर अविश्सनीय असा विजय साकारला. कोलकाताने प्रथम गोलंदाजी करताना चेन्नईला १०३ धावांतच रोखलं. प्रत्युत्तरादाखल खेळताना ८ विकेट्स राखून कोलकाताने अफलातून विजय साकारला.
कोलकाता वेगाने विजयाकडे
१०४ धावांचं मामुली लक्ष्य मिळालेल्या कोलकाता संघाला सुनील नरिन आणि क्विंटन डी कॉक यांनी ४६ धावांची खणखणीत सलामी दिली.
चेपॉकवरची चेन्नईची नीचांकी धावसंख्या
एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या चेपॉक स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्सच्या नावावर नकोसा विक्रम नोंदला गेला. कोलकाताविरुद्ध चेन्नईने १०३ धावा केल्या. चेपॉकवरची ही त्यांची नीचांकी धावसंख्या आहे. एकूणातही ही त्यांची तिसऱ्या क्रमांकाची नीचांकी धावसंख्या आहे.
चेन्नईचं लोटांगण; १०३ धावांची मजल
कोलकाता नाईट रायडर्सच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर चेन्नईने घरच्या मैदानावर लोटांगण घातलं. चेन्नईला केवळ १०३ धावांचीच मजल मारता आली. चेन्नईतर्फे शिवम दुबेने सर्वाधिक ३१ धावा केल्या. दुबेव्यतिरिक्त चेन्नईच्या एकाही फलंदाजाला आत्मविश्वासाने खेळता आलं नाही.
चेन्नईचा इम्पॅक्ट प्लेयरही माघारी
राहुल त्रिपाठीच्या जागी इम्पॅक्ट प्लेयर म्हणून आलेला दीपक हुड्डा भोपळाही फोडू शकला नाही.
चेन्नईचा निम्मा संघ तंबूत; अश्विनही बाद
अनुभवी रवीचंद्रन अश्विनही तंबूत परतल्याने चेन्नईची मोठी घसरगुंडी उडाली आहे.
चेन्नईची घसरगुंडी; विजय शंकर-राहुल त्रिपाठी माघारी
विजय शंकर आणि राहुल त्रिपाठी यांनी चेन्नईचा डाव सावरला पण त्यानंतर हे दोघेही बाद झाले.
विजय शंकरला जीवदान
विजय शंकरला इनिंग्जच्या सुरुवातीलाच जीवदान मिळालं आहे. सुनील नरिनने सोपा झेल सोडला.
कॉनवेपाठोपाठ रचीन रवींद्रही तंबूत
हर्षित राणाचा चेंडू फ्लिक करण्याचा रचीन रवींद्रचा प्रयत्न हवेत उंच उडाला. अजिंक्य रहाणेने चांगला झेल टिपत रवींद्रला तंबूत परतावले.
डेव्हॉन कॉनवे मोईन अलीची शिकार
चेन्नईचा सलामीवीर डेव्हॉन कॉनवे कोलकाताचा फिरकीपटू मोईन अलीची शिकार ठरला. त्याने १२ धावा केल्या.
राहुल त्रिपाठी, अंशुल कंबोज चेन्नई संघात
चेन्नई सुपर किंग्स संघाने कोलकाताविरुद्धच्या लढतीसाठी राहुल त्रिपाठी आणि अंशुल कंबोज यांना संधी दिली आहे. अंशुलचं हे चेन्नई पदार्पण असणार आहे.
कोलकाताने टॉस जिंकला, बॉलिंगचा निर्णय
कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणेने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
राहुल त्रिपाठीला पुन्हा संधी मिळणार?; अंशुल कंबोज अंतिम अकरात येणार का?
विजयपथावर परतण्यासाठी आतूर चेन्नईचा संघ अंतिम अकरात राहुल त्रिपाठीला संधी देणार का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. सुरुवातीच्या सामन्यांमध्ये राहुलला संधी मिळाली पण त्याला मोठी खेळी करता आली नाही. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केलेला वेगवान गोलंदाज अंशुल कंबोजला अंतिम अकरात संधी मिळते का हे पाहणंही रंजक आहे.
ऋतुराजच्या जागी कोणाला संधी मिळणार?
ऋतुराज गायकवाड हा चेन्नईसाठी महत्त्वाचा फलंदाज होता. कोपऱ्याला झालेल्या दुखापतीमुळे तो उर्वरित हंगामात खेळू शकणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. ऋतुराजच्या अनुपस्थितीत महेंद्रसिंग धोनीच संघाचं नेतृत्व करणार आहे. दरम्यान ऋतुराजच्या ऐवजी कोणत्या खेळाडूची निवड करणार यासंदर्भात चेन्नईने घोषणा केलेली नाही. ऋतुराजऐवजी पृथ्वी शॉ, मयांक अगरवाल, आयुष म्हात्रे यांच्या नावाची चर्चा आहे. मयांक अगरवालकडे आंतरराष्ट्रीय तसंच आयपीएलचा प्रदीर्घ अनुभव आहे. मुंबईकर युवा आयुष म्हात्रेला चेन्नईने ट्रायल्ससाठी बोलावलं होतं. पृथ्वी शॉ याच्यासाठी लिलावात बोली लागली नव्हती. याव्यतिरिक्त काही आंतरराष्ट्रीय खेळाडूंची नावंही चर्चेत आहेत.
महेंद्रसिंग धोनी पुन्हा कर्णधारपदासाठी सज्ज
आयपीएल स्पर्धेत २२६ सामन्यांमध्ये कर्णधारपदाचा अनुभव असणारा महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा कर्णधाराच्या भूमिकेत दिसणार आहे. चेन्नईत होणाऱ्या या लढतीत धोनीच्या संघासमोर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात खेळणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सचं आव्हान असणार आहे.